Spread the love

मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ७५० महिला शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग

धाराशिव – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शाश्वत शेती, पाणी व जमीन संवर्धन आणि महिला शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, धाराशिवची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत मंगल कार्यालय, धाराशिव येथे संपन्न झाली. या सभेला तब्बल ७५० महिला शेतकरी सभासदांची उपस्थिती लाभली.

सभेची प्रस्तावना कंपनीच्या संचालिका सुमित्रा शिराळ यांनी केली, तर सूत्रसंचालन संगमित्रा अंकुशराव यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने, दीपप्रज्वलनाने आणि स्वागतगीताने झाली.

मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व

या कार्यक्रमाला स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या सीईओ नसीम शेख, प्रोग्राम डायरेक्टर देवकन्या जगदाळे, प्रोग्राम मॅनेजर किरण माने यांच्यासह जिल्हा सीड प्रमाणीकरण कृषी अधिकारी राऊत सर, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक इनामदार सर, प्रोमेथियन स्पेंटा टेक्नॉलॉजी कंपनीचे जिल्हा विस्ताराधिकारी डॉ. वरळी, इको वेदा क्लायमेट चेंजचे महेश शिनगारे, परमेश्वर घुमटे, माजी सभापती सतीश घोडेगावकर, अॅग्रो नॉम एमपीसीचे संचालक शिंदे सर, वावर कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप बिराजदार, KVKच्या प्राध्यापक मरवळीकर मॅडम, Two Brothers India Farmचे प्रतिनिधी दिनेश सरतापे, गोविंद लोमटे (कावळेवाडी), महिला मोर्चा अध्यक्ष प्रीती कदम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे प्रतिनिधी पुरी सर आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणाला नवी दिशा

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नसीम शेख यांनी महिला शेतकऱ्यांनी पारंपरिक भूमिकेपलीकडे जाऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योजक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले. महिलांनी स्वतःच्या ज्ञानावर, कौशल्यावर आणि सामूहिक शक्तीवर विश्वास ठेवून शेती व व्यवसायात नेतृत्व करावे, असे त्यांनी सांगितले.

मरवळीकर मॅडम यांनी शेतकरी महिलांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व उपलब्ध संधींचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले. गोविंद लोमटे यांनी शेळीपालन व्यवसायाविषयी माहिती दिली. वावर कंपनीचे प्रदीप बिराजदार यांनी यावर्षी उपलब्ध असलेल्या IPM उत्पादनांची माहिती दिली. महेश शिनगारे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले.

Two Brothers India Farmचे प्रतिनिधी दिनेश सरतापे यांनी महिला शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व उत्पादनांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

“मी” नव्हे, “आपण” होऊन काम करूया!

स्वयं शिक्षण प्रयोग आणि मंजिरी सखीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची व्यापक भूमिका मांडताना महिलांनी केवळ कुटुंबावर अवलंबून न राहता स्वतःची स्वतंत्र आर्थिक आणि सामाजिक ओळख निर्माण करावी, असा संदेश देण्यात आला.

«“महिला घेणाऱ्या नव्हे, तर कमवणाऱ्या आणि देणाऱ्या बनाव्यात. महिलांची ओळख केवळ कोणाची आई, पत्नी किंवा मुलगी म्हणून नव्हे, तर स्वतःची स्वतंत्र ओळख असलेली सक्षम महिला म्हणून निर्माण व्हावी.”»

आज महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून त्यांच्या आत्मविश्वासासोबतच कुटुंबातील मान-सन्मानही वाढत आहे. हे परिवर्तन सामूहिक प्रयत्नातून घडत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

पाणी, जमीन, पर्यावरण आणि हवामान बदल ही भविष्यातील मोठी आव्हाने असून त्यासाठी नैसर्गिक शेती, पाणी संवर्धन आणि जमीन संरक्षणासाठी महिला-पुरुषांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.

“मी” नव्हे, “आपण” होऊन काम करूया; आपली जमीन, पाणी, शेती आणि पुढची पिढी वाचवूया, असा सामूहिक संदेश सभेत देण्यात आला.

३ कोटी २१ लाखांची आर्थिक उलाढाल; २५०० महिला सभासदांचा टप्पा

कंपनीच्या संचालिका दीपाली काकासाहेब थोडसरे यांनी कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा महिला सभासदांसमोर मांडला.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीने ३ कोटी २१ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच कंपनीचा सभासद परिवार सुमारे २५०० महिला सभासदांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

कंपनीमार्फत आतापर्यंत सुरू असलेल्या उपक्रमांसोबतच भविष्यातील व्यवसायवाढ, शेतकरी महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे आणि महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन सभासदांसमोर मांडण्यात आले.

सभासदांच्या अनुभवातून कंपनीवरील विश्वास अधोरेखित

प्रियंका शिंदे, वाडी बामणी यांनी मंजिरी सखीच्या सभासद झाल्यानंतर मिळालेल्या संधी, फायदे आणि स्वतःचा अनुभव महिला सभासदांसमोर मांडला. सामूहिक प्रयत्नातून महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असून प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठेशी जोडले जाण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.

महिला शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याच्या उद्देशाने कार्यक्रमस्थळी BP तपासणी, रक्तगट तपासणी आणि HB तपासणीचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामुळे सभासद महिलांना एकाच ठिकाणी आवश्यक प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व डेअरी चालकांचा गौरव

महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सभेदरम्यान मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकरी सभासदांना “उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

तसेच गावपातळीवर नेतृत्व करणाऱ्या महिलांना “सखी सन्मान – लीडर” पुरस्काराने गौरविण्यात आले. दूध व्यवसायात उल्लेखनीय काम करणाऱ्या डेअरी चालक महिलांनाही उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून महिला शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

खेळ, आनंद आणि उत्साहाने रंगली सभा

सभेच्या औपचारिक कार्यक्रमासोबतच महिलांमध्ये उत्साह व स्फूर्ती निर्माण करण्यासाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामूहिक प्रयत्नातून सक्षम महिला शेतकऱ्यांची नवी वाटचाल

मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची ही वार्षिक सर्वसाधारण सभा केवळ आर्थिक अहवाल मांडणारी सभा न ठरता महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक नेतृत्वाची दिशा ठरवणारे व्यासपीठ ठरली.

महिलांनी संघटित होऊन आपल्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवावी, शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढवावे आणि आपल्या कुटुंबासह गावाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे, हा संदेश या सभेतून प्रभावीपणे देण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सुमित्रा शिराळ यांनी सर्व महिला सभासद, मान्यवर, सहकारी संस्था व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहेदा मुजावर, मनीषा गुळवे, ऋषिकेश जगताप, रेखा गडदे, शिवानी पोतदार आणि आँचल जहांगीड यांनी विशेष योगदान दिले.

एकत्रित महिला शक्ती, शाश्वत शेती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची वाटचाल अधिक बळकट करण्याचा निर्धार या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.