Spread the love

पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह सरकारचे आभार , आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्याची अभिमानास्पद ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरचा आता पूर्णतः कायापालट होणार आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आपल्या राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.१८६६ कोटी रूपयांच्या तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शिखर समितीसह मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात साफ दुर्लक्ष झालेल्या या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मान्यता मिळाली आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महायुती सरकारने मोठे पाठबळ दिल्याबद्दल राज्य सरकारचे मनापासून आभार मानत असल्याचे मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी व्यापक विकास आराखड्याची व्यापक संकल्पना आपण मांडली होती. ठाकरे सरकारच्या काळात त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र राज्यात आपले महायुती सरकार आल्यानंतर प्राधान्याने हा विषय मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अगदी सुरुवातीपासून या महत्त्वाच्या आराखड्याकडे व्यक्तिशः लक्ष होते. मागील महिन्यात तुळजापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी जीर्णोध्दाराच्या कामांची पाहणी केली होती.आराखड्याचे सादरीकरण पाहत सर्व बाबी अत्यंत गांभीर्याने जाणून घेत काही महत्वाच्या सूचनाही केल्या होत्या व तत्वतः मंजुर देखील केला होता.आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे आई तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागला आहे. पुढील तीन वर्षांच्या आत ही सगळी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने या आराखड्यास आता अंतिम मंजुरी दिली असून त्यासाठी महायुती सरकारसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभारही आमदार पाटील यांनी मानले आहेत.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मुख्य दर्शन मंडपासह तेथील अनुषंगिक सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा १०८ फुटाचे भव्य शिल्प जाणार आहे. त्याचबरोबर घाटशीळ, सोलापूर महामार्ग, हडको आदी ठिकाणी भक्तनिवास, प्रसादालय, पुस्तकालय, भोजनालय आणि भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांचे सुसज्ज केंद्र तयार केले जाणार आहे. तसेच वाहनतळ आणि वृंदावन गार्डनप्रमाणे अत्याधुनिक उद्यानही साकारले जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या वृध्द व दिव्यांग भाविकांकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचाही यात अंतर्भाव करण्यात आला आहे. अंतिम विकास आराखड्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात आलेल्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता देखील मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद यात करण्यात आली आहे. भूसंपादनाबरोबर शासनाच्या विविध करासाठी लागणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधी आदी बाबींना हिरवा कंदील मिळाल्यामुळे तुळजापूर आणि परिसराचा चेहरामोहरा अधिक ठळकपणे बदलला जाईल, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी सर्वांच्या सहमतीने हा आराखडा स्वीकारण्यात आला आहे. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करून त्या सर्वांचे आक्षेप आणि सूचनांचा गांभीर्याने विचार करून या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. शहरात तसेच शहराकडून सोलापूर, बार्शी, धाराशिव, औसा आणि नळदुर्ग या पाचही दिशेला जाणार्‍या प्रमुख रस्त्यांवर तुळजापूर शहराच्या प्रवेशाजवळ आकर्षक आणि भव्य कमानी बसविण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचे ठरले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेवून भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रचलित दराच्या कैकपटीने मावेजा देवून विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात ३० % आर्थिक तरतूद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र विकासासाठी संपादीत केली जाणार आहे, त्यांना समाधानकारक आणि रास्त मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेवून जमिनीचा चांगला मोबदला दिला जाणार आहे. आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.