
आपले सरकार केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर
धाराशिव – गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार आणि रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये.त्याचे काम गावातच झाले पाहिजे आणि आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याला दर्जेदार,सुलभ आणि वेळेत सेवा मिळाली पाहिजे,असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले.
आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेताना डॉ.श्री.जाधव बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

नागरिकांसाठी नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे नगर पालिका प्रशासनाने तातडीने सक्रियपणे कार्यान्वित करावीत.जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील कामगिरीच्या आधारे महसूल,ग्रामविकास आणि नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ केंद्रांची उत्कृष्ट केंद्र म्हणून निवड केली जाणार असून,या उपक्रमात धाराशिव जिल्हा निश्चितच चांगली कामगिरी करेल,असा विश्वासही डॉ.श्री.जाधव यांनी व्यक्त केला.विभागात धाराशिव जिल्ह्याने यापूर्वी चांगले काम केले असून यापुढेही महसूल, ग्रामविकास आणि नगरपालिका या तिन्ही विभागाच्या आपले सरकार केंद्रांनी अधिक प्रभावीपणे काम करावे,असे त्यांनी सांगितले.

शासनाने ग्रामस्थांना विविध सेवा गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत.नागरिक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करू शकतात.त्यामुळे गावपातळीवरच आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून त्यांना उत्तम सेवा मिळणे आवश्यक असल्याचे डॉ.जाधव यांनी स्पष्ट केले.राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत १,२१२ सेवा ऑनलाइन झाल्या असून, नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. पासपोर्ट सेवेचे काम आणखी वेगाने करावे.क्रीडा विभागानेही ऑनलाइन सेवांना प्राधान्य द्यावे.किमान ९० टक्के सेवा नियत कालावधीत देण्याचे उद्दिष्ट ठेवावे.नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी ऑफलाइन अर्ज घेऊन आल्यास त्यांचे अर्ज ऑनलाइन करून घेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश डॉ.श्री.जाधव यांनी दिले.