मंचकी निद्रेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या.

मंचकी निद्रेच्या पार्श्वभूमीवर सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवींचा पलंग घासून-पुसून स्वच्छ धुऊन घेतला. तसेच आराधी महिलांनी मंचकी निद्रेसाठी आवश्यक असलेल्या गाद्यांमधील कापूस पिंजून घेतला.

धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराच्या वाढत्या अत्याचारांपासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी श्री तुळजाभवानी देवी योगनिद्रेत राहून महिषासुराशी युद्ध करण्याची तयारी करीत होत्या. महिषासुराच्या अत्याचारांमुळे ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी देवीला जागृत केले. जागृत झाल्यानंतर देवीने घोर रूप धारण करून महिषासुराचा संहार केला. त्यामुळे देवीच्या या निद्रेला ‘घोर निद्रा’ असेही संबोधले जाते.

भाद्रपद कृष्ण अष्टमीपासून अमावास्या समाप्तीपर्यंत श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा असते. त्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होतात. आठ दिवसांची मंचकी निद्रा पूर्ण करून ११ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहेत. यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे.

देशभरातील शक्तीपीठांच्या परंपरेत श्री तुळजाभवानी देवीचे विशेष महत्त्व आहे. श्री तुळजाभवानी देवींची मूर्ती चलमूर्ती असून, वर्षभरातील धार्मिक परंपरेनुसार देवी तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेतात. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस, सीमोल्लंघनानंतर पाच दिवस आणि शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस मंचकी निद्रेची परंपरा आहे.

यावेळी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो तसेच पुजारी व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते

  • Related Posts

    टंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल विभागाचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र भूजल अधिनियमाच्या कलमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना धाराशिव – खरीप हंगाम २०२६ मधील पहिल्या कळेत दुष्काळी परिस्थिती घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा विचार करता…

    नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुका क्रीडा संकुल पार्किंगसाठी अधिग्रहित

    Spread the love

    Spread the loveवाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय धाराशिव – तुळजापूर येथे ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी आणि वाहनांची संख्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *