विमुक्त जाती-भटक्या जमातीतील नागरिकांसाठी विशेष मोहीम ; १० ठिकाणी शिबिरांना प्रतिसाद
धाराशिव – विजाभज संवर्गातील ज्या नागरिकांचे सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण निश्चित नसल्याने त्यांना मूलभूत अधिकार तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली विविध ओळखपत्रे व प्रमाणपत्रे मिळविताना अडचणी येतात,अशा नागरिकांना विविध ओळखपत्रे व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सेवा संकल्प अभियान आणि ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी विविध ठिकाणी आयोजित शिबिरांमधून एकूण ४३८५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
विजाभजच्या नागरिकांना आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र,शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र,आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला,नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,रहिवास प्रमाणपत्र,अधिवास दाखला,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र यासह अन्य आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ मिळविण्यासाठी सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण निश्चित नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या.या पार्श्वभूमीवर अशा लाभार्थ्यांना विविध ओळखपत्रे व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या अभियानांतर्गत ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ ही विशेष मोहीम २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आली.त्यानुसार जिल्ह्यातील शिंगोली,जळकोट, कौडगाव,गोलेगाव,डाळींब,जेवळी, वाशी,सांजा,धाराशिव,सामनगाव, भूम,पारगाव,तेरखेडा,कळंब,इटकूर, अनाळा,परंडा,इटकळ,तुळजापूर, उमरगा,तुरोरी,दक्षिण जेवळी व आष्टाकासार या ठिकाणी शिबिरे संपन्न झाली.
या शिबिरांमध्ये एकूण ४३८५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये आधारकार्ड ३७७,निवडणूक ओळखपत्र १६७, शिधापत्रिका १०४,जात प्रमाणपत्र ५३७,आयुष्मान भारत कार्ड १०१०, उत्पन्नाचा दाखला १२६,नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र २६,रहिवास प्रमाणपत्र ५९,अधिवास दाखला ४,विवाह नोंदणी प्रमाणपत्र २१,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र १३,दिव्यांग प्रमाणपत्र ५,जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ३९ व अन्य आवश्यक ३१० प्रमाणपत्रे व ९८७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शासनाने या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत आवश्यक कागदपत्रे व योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून, त्याबद्दल नागरिकांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
या शिबिरांसाठी जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव व त्यांचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.त्यामुळे विविध प्रमाणपत्रांपासून वंचित असलेल्या भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना एकाच मोहिमेत आवश्यक शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला.