पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांना सतर्कतेच्या सूचना
धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस पाटलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याला आणि संबंधित विभागाला द्यावी,अशा सूचना देण्याचे निर्देश धाराशिव,उमरगा, कळंब व भूम येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव,उमरगा,कळंब व भूम येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील सर्व पोलीस पाटलांना याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. पोलीस पाटलांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अवैधरीत्या दारू विक्री होत आहे का,यावर लक्ष ठेवावे. अशी विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याला तसेच संबंधित विभागाला माहिती द्यावी.
पोलीस पाटलांच्या कार्यक्षेत्रात अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पोलीस पाटलांवर निश्चित करण्यात येईल,याचीही त्यांना स्पष्ट जाणीव करून द्यावी.तसेच या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यालयास सादर करावा,असे निर्देश देण्यात आले आहेत.