देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे आद्य कर्तव्य

Spread the love

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ

धाराशिव – देशाची सुरक्षितता ही सैनिकांच्या हाती आहे. सैनिक हे देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करत असतात.कुटुंबासाठी कमी आणि देशासाठी जास्त वेळ देत असतात.त्यामुळे देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे आद्य कर्तव्य आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते.यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, पोलीस उपाधीक्षक (गृह) डी.पी.पारेकर, जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, एसटीचे विभाग नियंत्रक अजय पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री पुजार पुढे म्हणाले की,ध्वज दिन निधी संकलनातून सैनिक व त्यांच्या कुटुंबांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त ध्वजदिन निधी संकलित करणार असल्याची ग्वाही देऊन श्री.पुजार म्हणाले की,भारतीय प्रशासकीय सेवेत आल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान आम्ही काही अधिकारी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या सीमेवर दहा दिवस सैनिकांसोबत होतो.त्यांचे जीवन अगदी जवळून बघितले.उणे तापमानात राहून ते देशाचे संरक्षण करतात असे त्यांनी सांगितले.

श्रीमती.ज्योती पाटील म्हणाल्या की, देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.जिल्ह्यातील ज्या सैनिकांना जमिनी देण्याचा प्रश्न आहे,तो लवकरच सोडविण्यात येईल.तसेच त्यांच्या अन्य समस्यांचे देखील निराकरण करण्यात येईल.शासनाच्या विविध योजना आहेत,त्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सैनिकांनी, माजी सैनिकांनी व त्यांच्या पाल्यांनी घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील म्हणाल्या, जिल्ह्यातील सैनिकांचे प्रश्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून सोडवण्यात येतील. सैनिकांनी देशासाठी त्याग करून मातृभूमीचे रक्षण केले आहे.अतिशय दुर्गम भागात जीव संकटात टाकून सैनिक हे देशाची सेवा करतात असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्ह्यातील शहीद जवानांच्या फोटोला व अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केली.शहीद जवानांना बिगूल वाजवून व उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. वीर पत्नी श्रीमती प्रभावती निकम, श्रीमती रहना बेगम,श्रीमती संगीता सावंत,श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड श्रीमती कांताबाई कदम,वीरमाता श्रीमती माताबाई नागरगोजे,वीर बंधू दिलीप बनसोडे व शिवाजी कोळपे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील,सहायक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अश्विनी जाधव,अधिकार मित्र अशोक गाडेकर,सैनिक कल्याण विभागाचे गुरुनाथ कुलकर्णी,अनिल मलशेट्टी यांचा तर उत्कृष्ट ध्वज दिन निधी संकलनाबद्दल गटशिक्षणाधिकारी उमरगा,कळंब,भूम,लोहारा,वाशी, जिल्हा सामान्य रुग्णालय,जिल्हा आरोग्य विभाग,राज्य परिवहन महामंडळ,श्रीपतराव भोसले हायस्कूल,उपप्रादेशिक परिवहन विभाग,जिल्हा हिवताप अधिकारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

माजी सैनिक पाल्य ज्ञानेश्वर मोरे याला २० हजार रुपयांचा धनादेश, दहावीमध्ये उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल आर्या कुलकर्णी,आदित्य वाघ याला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल ७५ हजार रुपयांचा धनादेश व आर्मी ट्रेनिंग गया येथे निवड झाल्याबद्दल हरिकेश गाडेकर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मागील वर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलित करण्याचे ५७ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट दिले असता १ कोटी ३४ लाख ८४ हजार रुपये निधी संकलित करून राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला.यावर्षी देखील सन २०२५ चे ५७ लक्ष रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून ध्वज दिन निधी संकलनासाठी १० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला.हा धनादेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल श्री.पांढरे यांच्याकडे सुपूर्द केला.

कार्यक्रमात सचिन ढेपे,चंद्रकांत गुंड व रेखा सोनटक्के यांनी सुरेख देशभक्ती गीतांचे सादरीकरण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विशाल सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाला वीर पत्नी, वीर माता,माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय,एन.एन.सीचे विद्यार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला


  • Related Posts

    जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान…

    जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *