०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान
धाराशिव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून,जिल्ह्यात एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.या प्रस्तावित मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या सादर करण्याचे आवाहन राजकीय पक्षांच्या प्रमुख व प्रतिनिधींना करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.या निवडणूक कार्यक्रमाची तसेच जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी, ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी, ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी,धाराशिव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव,नायब तहसीलदार (निवडणूक) तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत उपस्थित राजकीय पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या एकूण ७६ मतदान केंद्रांची तालुकानिहाय माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात १६, तुळजापूर ११,उमरगा १२,लोहारा ६,कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंडा तालुक्यात ८,अशी तालुकानिहाय एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.बैठकीत ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगाने प्रस्तावित मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीबाबत चर्चा करण्यात आली.या प्रारूप यादीबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या संबंधितांनी सादर कराव्यात,असे उपस्थित राजकीय पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधींना कळविण्यात आले.
जिल्ह्यातील प्रस्तावित ७६ मतदान केंद्रांची प्रारूप यादी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी,०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ यांच्या कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेनंतर मतदान केंद्रांची अंतिम यादी निश्चित करण्यात येईल.अंतिम मतदान केंद्रांची यादी निश्चित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल,असे कीर्ती किरण पुजार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.