जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; २८ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध
धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व शासकीय विश्रामगृहांच्या ठिकाणी मिरवणूक,मोर्चा,आंदोलन, निदर्शने,उपोषण,घोषणा, निवडणूक प्रचार आदींवर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.हा आदेश २८ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सभा,मिरवणुका,निवडणूक प्रचार आदी बाबी नियंत्रित करणेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी हे आदेश काढले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी नगरपरिषद हद्दीत विविध बाबींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची मिरवणूक किंवा मोर्चा काढणे,आंदोलन करणे,निदर्शने करणे तसेच उपोषण करण्यास बंदी राहणार आहे.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आदी बाबींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.याशिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश २८ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत अंमलात राहणार आहे.