
जिल्ह्यात विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकाच दिवशी सुमारे १,६०० प्रमाणपत्रांचे वाटप
धाराशिव – कायमस्वरूपी रहिवासाचे ठिकाण निश्चित नसल्याने आधारकार्डापासून जात प्रमाणपत्रापर्यंतची कागदपत्रे मिळविताना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी प्रशासनच आता त्यांच्या दारी पोहोचले आहे. शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत अधिकारांपासून केवळ आवश्यक कागदपत्रांअभावी कोणीही वंचित राहू नये,या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांत एकाच दिवशी जवळपास १,६०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
विजाभज संवर्गातील अनेक नागरिकांचे सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण निश्चित नसल्याने त्यांना मूलभूत अधिकारांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे व प्रमाणपत्रे मिळविताना अडचणी निर्माण होतात.आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड,उत्पन्नाचा दाखला,नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,रहिवास प्रमाणपत्र, अधिवास दाखला,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र,जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक प्रमाणपत्रे नसल्यामुळे अनेकदा पात्र असूनही नागरिकांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते.
ही अडचण लक्षात घेऊन शासनाने सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण निश्चित नसलेल्या विजाभज संवर्गातील लाभार्थ्यांना विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ ही विशेष मोहीम २७,२८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील शिंगोली,जळकोट,कौडगाव, गोलेगाव,डाळींब,जेवळी आणि वाशी या ठिकाणी विशेष शिबिरे घेण्यात आली.या शिबिरांमध्ये संबंधित नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि शासनाच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी विविध विभागांच्या यंत्रणांनी समन्वयाने काम केले.
शिबिरांच्या माध्यमातून आधारकार्ड,निवडणूक ओळखपत्र,शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र,आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला,नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,रहिवास प्रमाणपत्र, अधिवास दाखला,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसेच जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आदी जवळपास १,६०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
वर्षानुवर्षे आवश्यक कागदपत्रांसाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना गावाजवळच शासकीय यंत्रणा उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला.हक्काची ओळख आणि विविध शासकीय योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्यातील विजाभज प्रवर्गातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासनाचे आभार मानले.
या विशेष शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व त्यांचे कर्मचारी, तसेच सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शिबिरस्थळी उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही केली.विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना आवश्यक सेवा आणि प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.