
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश
- मुदत न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
- ९० ते १०० टक्के प्रगतीची २५ कामे आठ दिवसांत, तर ८० ते ९० टक्के प्रगतीची ४४ कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश
धाराशिव – गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पाणी मिळावे,यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.मात्र, ही कामे केवळ कागदावरील उद्दिष्टपूर्तीपुरती मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या जल जीवन मिशनच्या कामांना गती देऊन ती विहित मुदतीत पूर्ण करा.विशेषतः अंतिम टप्प्यात पोहोचलेली कामे तातडीने मार्गी लावा.निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर निविदेतील अटी व शर्तींनुसार कठोर कारवाई करा, आवश्यकतेनुसार त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह संबंधित अधिकारी,उपअभियंता,कनिष्ठ अभियंता,TPI सहाय्यक,लेखा कर्मचारी तसेच PMC WAPCOS चे प्रतिनिधी उपस्थित होते.
५९४ पैकी ३४६ कामे पूर्ण
जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण ५९४ कामे सुरू असून,त्यापैकी ३४६ कामे पूर्ण झाली आहेत.उर्वरित २४८ कामे प्रगतिपथावर आहेत. प्रगतिपथावरील कामांमध्ये शून्य ते २५ टक्के प्रगती झालेली २२ कामे, २५ ते ५० टक्के प्रगतीची ३९ कामे,५० ते ७५ टक्के प्रगतीची ९३ कामे,तर ७५ ते ९९ टक्के प्रगती झालेली ९४ कामे आहेत.
जिल्ह्यातील कामांची सद्यस्थिती, प्रत्यक्ष झालेली प्रगती आणि काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला.
१९९ कामांना तांत्रिक बदल अथवा योजना सुधारणेची गरज
जल जीवन मिशनच्या कामांची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी आवश्यक तांत्रिक बदल अथवा योजना सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची १९९ कामे असून,त्यापैकी १२० कामांना शासन स्तरावरून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
,अंतिम टप्प्यातील कामांसाठी ‘डेडलाइन’
बैठकीत प्रत्येक कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी
अंतिम टप्प्यात आलेल्या कामांसाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली.८० ते ९० टक्के प्रगती झालेली ४४ कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करावीत,तर ९० ते १०० टक्के प्रगती झालेली २५ कामे पुढील आठ दिवसांत पूर्ण करावीत,असे सक्त निर्देश त्यांनी दिले.
कामे अंतिम टप्प्यात असतानाही ती प्रलंबित राहिल्यास त्याचा थेट परिणाम संबंधित गावातील पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे यंत्रणेने प्रत्येक प्रलंबित कामाचा नियमित पाठपुरावा करून ते निर्धारित वेळेत पूर्ण होईल,याची दक्षता घेण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
मुदत पाळली नाही तर कारवाई
जल जीवन मिशनच्या कामांमध्ये विलंब खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर निविदेतील अटी व शर्तींनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
जल जीवन मिशनचे काम प्रलंबित राहिल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागू नये,याबाबतही बैठकीत स्पष्ट भूमिका घेण्यात आली.ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनअंतर्गत कामे प्रगतिपथावर अथवा अपूर्ण आहेत आणि अशा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासते,त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे.
अशा गावांमध्ये टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्चही संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात यावा,असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी पाण्याचा थेट संबंध असल्याने जल जीवन मिशनची अपूर्ण कामे वेळेत मार्गी लावण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.अंतिम टप्प्यात पोहोचलेली कामे निश्चित मुदतीत पूर्ण करून त्याचा प्रत्यक्ष लाभ गावातील कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांनी कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी दिले.