शेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक
८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज.

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, शेती सक्षम झाली तर गावाची आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते.शेतकरी,महिला,युवक,उद्योग,शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत ‘विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’ घडविण्याचा संकल्प करूया,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी स्वातंत्र्यसैनिक बलभीम पाटील,बुबासाहेब जाधव,दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी कलावती उंबरे,केसरबाई टापरे,जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ते १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंतचा लाभ अपेक्षित आहे.आतापर्यंत १२ हजार २९४ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर १०५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.आधुनिक तंत्रज्ञान, AI आधारित सोयाबीन प्रकल्प, IIT बॉम्बेच्या सहकार्याने कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.असे ते म्हणाले.
‘हरित धाराशिव’ अभियानातून गतवर्षी १९ जुलै रोजी एकाच दिवशी १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यापैकी ८५ टक्क्यांहून अधिक रोपे जगविण्यात आली आहेत. यंदा १४ ऑगस्ट रोजी आठ ठिकाणी ३३.७ हेक्टर क्षेत्रावर १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ आणि नाला खोलीकरणाच्या माध्यमातून ३०२ प्रकल्पांतून १७०.३८ लाख घनमीटर गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात आला असून, त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि भूजलसाठा वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीवरही शासनाचा भर असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ४६ पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळत आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून सुमारे १५ हजार स्वयं- सहाय्यता गटांद्वारे १ लाख ३६ हजारांहून अधिक कुटुंबांचे संघटन झाले आहे. तुळजापूर येथे २० कोटी रुपयांच्या निधीतून ‘उमेद मॉल’ उभारण्यात येत आहे.जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ५६ उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार झाले असून, १ हजार ११८ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून दोन हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे आकाश देण्यासाठी ‘गावातील शाळा ते NASA’ हा उपक्रम राबविण्यात येत असून,जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २० विद्यार्थ्यांना NASA भेटीची संधी मिळणार आहे.‘हर घर जल’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ४८० घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा झाला असून,२९७ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया सुविधांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून,जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४९४ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असल्याचेही त्यांनी नमूद केले.‘आपला जीव धाराशिव–व्हिजन २०३०’ आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ यांच्या माध्यमातून शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून धाराशिवला विकासाचे नवे मॉडेल बनविण्याचा संकल्प करूया,असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
शेतकरी सक्षम,महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी,युवकांच्या हाताला रोजगार, उद्योगांना चालना आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधा मिळणे हेच विकसित धाराशिवचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ध्वजारोहणाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत झाले.त्यानंतर राज्यगीत झाले. पालकमंत्री सरनाईक यांच्यासह मान्यवरांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले.यावेळी उपस्थितांना जलसंधारण दिन आणि व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी,विविध क्षेत्रांतील मान्यवर,विविध पक्षांचे पदाधिकारी,नागरिक,पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हनुमंत पडवळ यांनी मानले.