
धाराशिव : जिल्ह्यात गाजत असलेल्या जवळपास २२ कोटी रुपयांच्या कथित कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या चौकशीला आणि दोषींवर झालेल्या कारवाईला आता नव्या प्रश्नांची किनार लागली आहे. या प्रकरणातील कारवाई अद्याप परिपूर्ण आणि पारदर्शक झालेली नसल्याचा आरोप करत शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणाच्या सुरुवातीच्या चौकशीदरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी, धाराशिव यांचेही नाव चर्चेत आले होते. मात्र, पुढील कारवाईमध्ये त्यांना वगळण्यात आल्याने याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईतून वगळण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल मनोज जाधव यांनी उपस्थित केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई, मग इतर तालुक्यांचे काय?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुळजापूर तालुक्यातील कारवाईवरून उपस्थित होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. तुळजापूर तालुक्यातील सर्व कृषी मंडळ अधिकाऱ्यांना दोषी धरून निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे चित्र असताना धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी जर या प्रकरणात दोषी आढळले असतील, तर त्या तालुक्यांतील मंडळ कृषी अधिकारी निर्दोष कसे ठरले? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
एका तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांवर सामूहिक कारवाई आणि इतर तालुक्यांमध्ये मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, यामागील निकष स्पष्ट झाले पाहिजेत. चौकशीसाठी सर्व तालुक्यांना समान निकष लावण्यात आले होते का, याचीही माहिती जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
‘चौकशी पुन्हा खोलवर करा’
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे. कृषीमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका, कागदपत्रे, खरेदी प्रक्रिया आणि संबंधित निविष्ठांच्या वितरणाची सखोल तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“जर तुळजापूर तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी दोषी ठरत असतील, तर इतर तालुक्यांतील अधिकारी पूर्णपणे निर्दोष कसे? आणि जर इतर तालुक्यांतील अधिकारी निर्दोष असतील, तर त्यामागील चौकशीचे निकष जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजेत,” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
‘बडे मासे’ समोर येणार का?
या प्रकरणात आतापर्यंत झालेली कारवाई ही अंतिम नसून चौकशी अधिक खोलवर गेल्यास आणखी काही अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका समोर येऊ शकते, असा दावा मनोज जाधव यांनी केला आहे. त्यामुळे कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मागणीवर कृषीमंत्री आणि कृषी विभाग काय भूमिका घेतात, याकडे आता जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्व तालुक्यांतील कृषी मंडळ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी दिला आहे.