दानपेटीतील अंगठी प्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट : मंदिर संस्थानची भूमिका मांडली

Spread the love

धाराशिव – दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी गेल्या दोन दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांमध्ये वस्तुस्थिती न तपासता अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे.

पुण्यातील भोसरी येथील भाविक सुरज कृष्णा टिंगरे हे दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४:१५ ते ४:३० या वेळेत श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते.दर्शनावेळी त्यांनी दानपेटी क्रमांक १२ मध्ये दान स्वरूपात काही रक्कम टाकत असताना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडल्याचा दावा केला आहे.सदर अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाकडे लेखी विनंती अर्ज सादर केला होता.

या अर्जाच्या अनुषंगाने,दिनांक ३ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील ठरावाचा संदर्भ मंदिर संस्थानने दिला आहे.या ठरावानुसार,श्री तुळजाभवानी देवींच्या दानपेटीत भाविकांकडून नजर चुकीने पडलेल्या मौल्यवान वस्तू या दान स्वरूपात समजण्यात येतील व त्या परत देण्यात येणार नाहीत,असा स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला आहे.

या निर्णयानुसार,सुरज कृष्णा टिंगरे यांना मंदिर संस्थानच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत पत्राद्वारे सदर बाब कळविण्यात आली आहे.मात्र,या प्रकरणाबाबत काही प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती न तपासता बातम्या प्रसिद्ध केल्याने भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे मंदिर संस्थानने नमूद केले आहे.

मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अशा प्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर आलेले आहेत.काही अपप्रवृत्तीचे लोक “चुकून दानपेटीत मौल्यवान वस्तू पडली”असा दावा करून दानपेटीतून मौल्यवान वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी तसेच दानपेटीतील पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यासाठीच हा नियम करण्यात आलेला आहे.हे विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे की,असा नियम करणारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे एकमेव संस्थान नाही,तर देशातील अनेक देवस्थानांनीदेखील याच धर्तीवर असे नियम अमलात आणलेले आहेत.

तरी,प्रसारमाध्यमानी वस्तुनिष्ठता, अधिकृत कागदपत्रे व मंदिर संस्थानची भूमिका समजून घेऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच,भाविक भक्तांनी दानपेटीमध्ये दान करताना दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता घ्यावी,असे नम्र आवाहनही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *