पं.जयतीर्थ मेवुंडींच्या गाण्याने रसिक तल्लीन ; समाजसेविका सुजाता चव्हाण यांचा सत्कार
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याचे आघाडीचे शास्त्रीय गायक पं.जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.त्यांच्या भावस्पर्शी सुरावटीनं सभागृहात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ यांसारख्या भक्तिगीतांच्या सादरीकरणावर श्रोते तल्लीन होऊन दाद देत होते.
कार्यक्रमाची सुरुवात पं.मेवुंडी, तहसीलदार व विश्वस्त अरविंद बोळंगे आणि तहसीलदार व व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुजाता लक्ष्मण चव्हाण (बाबई) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
बालविवाह निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या सुजाता चव्हाण यांनी आजवर तब्बल ७० बालविवाह रोखले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे त्यांना देवीची प्रतिमा, कवड्याची माळ,महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच पं.जयतीर्थ मेवुंडी व संगीत दिग्दर्शक गौरव चाटी यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक शहाजी रूपनवर, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा हा कार्यक्रम संगीत, समाजसेवा आणि भक्तीचा संगम ठरला.

