
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनस्थळी भेट देत तासिका निदेशकांशी साधला संवाद; नियमितीकरण, सन्मानजनक मानधन आणि सेवासुरक्षेच्या मागण्यांना जाणून घेतले
धाराशिव (प्रतिनिधी) : – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या निदेशकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तासिका निदेशकांच्या समस्या, अडचणी आणि प्रलंबित मागण्या सविस्तरपणे जाणून घेतल्या.
अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेले निदेशक विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. मात्र, दीर्घकाळ सेवा करूनही त्यांना सेवासुरक्षा, नियमितीकरण आणि आर्थिक स्थैर्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी आमदार डॉ. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी आंदोलकांनी सेवेत नियमितीकरण करणे, अनेक वर्षांच्या अनुभवाला योग्य मान्यता देणे, सन्मानजनक मासिक मानधन निश्चित करणे, सेवेत स्थैर्य निर्माण करणे तसेच सेवासुरक्षा प्रदान करणे आदी प्रमुख मागण्या मांडल्या. या मागण्यांसोबतच तासिका निदेशकांच्या सेवेशी संबंधित इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निदेशकांच्या समस्या समजून घेत त्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा विश्वास दिला. कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तासिका निदेशकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवेचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तासिका निदेशकांच्या श्रमाला सन्मान, अनुभवाला योग्य न्याय आणि त्यांच्या भविष्याला सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.
या भेटीमुळे आंदोलनकर्त्या तासिका निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनदरबारी मांडण्याचा मार्ग उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.