शासकीय वाहनातून रुग्णालयात केले दाखल; उपचार सुरू होईपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुग्णालयात थांबले

धाराशिव -: उमरग्याहून धाराशिवकडे परत येत असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी तुळजापूर-लातूर महामार्गावरील काक्रंबा येथे अपघातग्रस्त झालेल्या दाम्पत्याला तातडीने मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले. सुनील बेंद्रे आणि त्यांच्या पत्नी पद्मावती बेंद्रे यांचा अपघात झाल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी आपले शासकीय वाहन थांबवून त्यांची आस्थेने विचारपूस केली.

अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही आपल्या शासकीय वाहनातून सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विशेष म्हणजे, अपघातग्रस्तांवर उपचार सुरू होईपर्यंत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर हे दोघेही रुग्णालयात उपस्थित राहिले.

प्रशासकीय कामकाजाच्या धावपळीतही रस्त्यावर संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाण्याची ही कृती प्रशासनातील संवेदनशीलतेचे दर्शन

घडवणारी ठरली. पदापेक्षा माणुसकी मोठी असल्याचा संदेश या घटनेतून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडदळकर यांनी दिला आहे.