शॉर्टसर्किटचा कहर! अणदूरमध्ये सात एकर ऊस जळून खाक; तीन शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी!

Spread the love

तुळजापूर / अणदूर 

आधीच भीषण दुष्काळाचे संकट, त्यात हातातोंडाशी आलेल्या उसाच्या पिकावर आगीचा घाला! तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचा तब्बल सात एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून तीन शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

अणदूर शिवारातील शिवराज कुताडे, लक्ष्मण हागलगुंडे आणि श्याम कुताडे यांच्या शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की, डोळ्यादेखत सात एकरांतील ऊस जळून राख झाला.

आधीच दुष्काळाने शेतीचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना नगदी पीक असलेला ऊस आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्षभर केलेले कष्ट, खर्च आणि उत्पन्नाच्या अपेक्षा क्षणात राख झाल्याने तिन्ही शेतकरी हतबल झाले आहेत. या घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान पाहून सरकार जागे होणार का?

या दुर्घटनेची शासनाने तातडीने दखल घेऊन महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे करावेत, नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. केवळ पंचनाम्याचे आश्वासन नको, तर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घटनास्थळी दीपक दादा आलूरे, युवा सेनेचे राहुल मुळे, चंद्रकांत घुगे, गणेश देवशिंगकर, कृषी सहाय्यक अधिकारी पी. आर. जाधव, पोलीस पाटील जावेद शेख आणि अरविंद गायकवाड यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांचे सांत्वन केले. शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनीही शासनाकडे तिन्ही शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

आगीत ऊस जळाला; पण शेतकऱ्यांच्या आशा जळू देऊ नका! शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, हीच नुकसानग्रस्तांची आर्त मागणी आहे.

  • Related Posts

    शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ करा; आ. डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा…

    वाशी नगरपंचायतीला अग्निशामक केंद्रासह अग्निशमन वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा :- प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत शासनाची प्रशासकीय मान्यता; नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय धाराशिव – : धाराशिव जिल्ह्यातील वाशी नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेला आता बळकटी मिळणार असून, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *