
तुळजापूर : जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर चीनच्या भूमीवर मराठ्यांचा झेंडा उंचावणाऱ्या तुळजापूरच्या कन्येचा संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चीनमधील जिनशान येथे झालेल्या पाचव्या वर्ल्ड ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या प्रियांका किरण हंगरगेकर हिचा तिच्या माता-पित्यांसह तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे सन्मान करण्यात आला. यावेळी प्रियांकाच्या यशाचे कौतुक करताना जरांगे पाटील यांनी, “मराठ्यांचे नाव तू सातासमुद्रापार पोहोचविलेस, त्याबद्दल तुला धन्यवाद!” अशा गौरवोद्गारांतून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळविणे ही सोपी गोष्ट नाही. अनेक अडचणींवर मात करीत प्रियांकाने मिळविलेले हे यश तुळजापूर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. तिच्या या कामगिरीमुळे केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण तुळजापूर तालुक्याची मान उंचावली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सन्मानामुळे प्रियांकाच्या यशाला विशेष दाद मिळाली.

तुळजापूर ते जळकोट… जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाजाचा उत्स्फूर्त जनसागर!
दरम्यान, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तुळजापूर तालुका दौऱ्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तुळजापूरपासून तीर्थ गंधोरा, नळदुर्ग ते जळकोटपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करीत आणि फुलांची उधळण करीत जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मराठा समाजबांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. घोषणांचा गजर, फुलांची उधळण आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. तुळजापूर, तीर्थ गंधोरा, नळदुर्ग आणि जळकोट परिसरात स्वागतासाठी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर दुसरीकडे चीनमध्ये आंतरराष्ट्रीय पदक पटकावणाऱ्या तुळजापूरच्या कन्येचा त्यांच्याच हस्ते गौरव, असा दुहेरी अभिमानाचा क्षण या दौऱ्यादरम्यान पाहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात तुळजापूरच्या कन्येची भरारी आणि जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाजाचा जनसागर, या दोन्ही घटनांनी तुळजापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच चर्चेत राहिले