
शहरातील एका चौकाला नाव देण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची घोषणा; पुढील पिढ्यांसाठी क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणार

आदिवासी, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महामानव भगवान बिरसा मुंडा यांचा इतिहास आता धाराशिवच्या भूमीतही अभिमानाने जपला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात आजवर त्यांचे एकही स्मारक उभारण्यात आलेले नाही. ही उणीव दूर करण्यासाठी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच शहरातील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करत महामानवांना आदरांजली वाहिली. यावेळी नागरिकांनी शहरातील एका चौकाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावर जिल्ह्यात त्यांच्या नावाचे स्मारक आहे का, अशी विचारणा आमदार पाटील यांनी केली. जिल्ह्यात एकही स्मारक नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा केवळ एका समाजाचा इतिहास नाही. तो अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहण्याची प्रेरणा आहे. हा प्रेरणादायी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

या स्मारकासाठी महाराष्ट्र शासन, नगरपालिका प्रशासन, जिल्हावासीय आणि समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून प्रयत्न केले जातील. त्यासाठी लवकरच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे आणि सर्व नगरसेवकांनी पुढील बैठकीत स्मारक उभारणी व चौक नामकरणाबाबत सर्वानुमते ठराव घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बिरसा मुंडा यांचे स्मारक

म्हणजे केवळ दगड-मातीची वास्तू नव्हे, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा, स्वाभिमानाचा संदेश आणि वंचितांच्या संघर्षाचा सन्मान असेल. धाराशिवच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या विचारांना मानाचे स्थान मिळण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,सुनील काळे प्रदेश अध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ,सतीश दंडनाईक,ऍड नितीन भोसले,नगराध्यक्षा सौ.नेहा काकडे,नगरसेवक अमित शिंदे,राजाभाऊ पवार,सौ.वंदना पवार,अभिजित काकडे,राहुल काकडे,सिद्धार्थ बनसोडे,रवी मुंडे,विलास लोंढे,धनंजय पाटील,सौ.अलकाताई पारवे,
बापू पवार जिल्हाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ, कमलाकर पवार,दादा पवार,नाना पवार,संजू पवार,छगन पवार,जितेंद्र काळे, अरुण काळे, दिलीप चव्हाण, गणेश पवार उपस्थित होते.