
धाराशिव (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतकरी व ग्रामीण कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा कठीण परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्या व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सक्तीच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाड्यातील अनेक शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबे आर्थिक अडचणीत असताना मायक्रो फायनान्स कंपन्या व वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. विशेषतः नांदेड व परभणी जिल्ह्यांतील कर्जवसुलीशी संबंधित गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कर्जवसुलीच्या नावाखाली कर्जदारांना धमकी देणे, दमदाटी करणे तसेच मानसिक त्रास देण्याच्या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच सक्तीची कर्जवसुली तात्पुरती थांबविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा आणि कर्जदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना कर्जवसुलीच्या दबावातून दिलासा मिळावा, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.