नागरिकांच्या व्यथा जाणून घेत समस्यांच्या निवारणाची दिली ग्वाही
- हक्काच्या निवाऱ्यासह पाणी, रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य
- चिमुकल्यांशी साधला संवाद,
- शिक्षणाचे महत्त्वही पटवून दिले.
- धाराशिव – दिवाळी म्हणजे आनंदाचा,प्रकाशाचा आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण.मात्र,समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आणि उदरनिर्वाहाच्या संघर्षाचा अंधार कायम आहे.अशा परिस्थितीत कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी वस्तीवर दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी थेट पारधी वस्तीवर पोहोचून तेथील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या आपुलकीने जाणून घेतल्या. हक्काचा निवारा,पिण्याचे पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून तातडीने निवारण करण्याची ग्वाही दिली. प्रशासनाच्या या संवेदनशील भेटीमुळे पारधी बांधवांच्या मनात विश्वास निर्माण झाला,तर त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा दिवा प्रज्वलित झाला.
दिवाळीच्या मंगल पर्वावर जिल्हाधिकारी पुजार यांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री मौजे पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते.समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या पारधी बांधवांची दिवाळी गोड व्हावी,त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेता याव्यात आणि प्रशासनाचा आधार त्यांच्यापर्यंत पोहोचावा,या भावनेतून ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

जिल्हाधिकारी पुजार यांनी वस्तीवरील नागरिकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.त्यांच्या राहणीमानाची,दैनंदिन खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची आणि उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या कामांची सविस्तर माहिती घेतली.त्यांच्या अडचणी समजून घेताना प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.यावेळी पारधी समाजातील बांधवांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

पानगाव येथील पारधी बांधव अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत.मात्र,आजही स्वतःच्या मालकीची हक्काची जागा नसल्याची व्यथा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. पिढ्यानपिढ्या वास्तव्य करूनही हक्काच्या जागेचा प्रश्न सुटलेला नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर वस्तीवरील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या मांडून ती सोडविण्याची मागणी केली. वस्तीवरील अनेक नागरिक नजीकच्या फटाका कारखान्यात तसेच शेतांमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मात्र,कायमस्वरूपी रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने त्यांना उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी पुजार यांनी नागरिकांच्या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. हक्काच्या जागेचा प्रश्न,पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता या सर्व बाबींवर योग्य ती कार्यवाही करून समस्यांचे तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चिमुकल्यांशी मनमोकळ्या गप्पा ; शिक्षणातून उज्ज्वल भविष्याचा संदेश
या भेटीतील आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीवरील लहान मुलांशी साधलेला मनमोकळा संवाद.मुलांशी आपुलकीने बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक मुलाने शाळेत गेले पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे,यासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा,असे श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले. शिक्षणामुळे मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते.त्यामुळे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये,हा संदेश त्यांनी पालकांना दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांनी शासकीय आश्रमशाळांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.आश्रमशाळांमध्ये मुलांच्या शिक्षणासोबतच निवासाची आणि आरोग्याची मोफत व योग्य काळजी घेतली जाते,अशी माहिती त्यांनी दिली. पालकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे,यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
दिवाळीचा फराळ अन् आपुलकीचा गोडवा
दिवाळीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने पारधी वस्तीवरील नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.लहान मुलांना फटाकेही देण्यात आले. त्यामुळे वस्तीवरील चिमुकल्यांच्या आनंदात भर पडली.
मात्र,या भेटीतील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षण वेगळाच ठरला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या आपुलकीने ऐकून घेतल्याने भारावलेल्या पारधी बांधवांनी स्वतःकडील खाऊ अत्यंत प्रेमाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनीही त्यांच्या या प्रेमाचा स्वीकार करत तो खाऊ आपुलकीने खाल्ला.
हा प्रसंग केवळ खाऊ देण्या-घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर प्रशासन आणि समाजातील वंचित घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या विश्वासाचे प्रतीक ठरला. एका बाजूला नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे जिल्हाधिकारी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडील खाऊ देऊन प्रेम व्यक्त करणारे पारधी बांधव,या प्रसंगाने दिवाळीच्या आनंदाला माणुसकीची एक वेगळीच किनार लाभली.
प्रशासनाच्या आपुलकीने उजळली पारधी वस्तीची दिवाळी
दिवाळीच्या सणात घरोघरी दिवे लावले जातात.मात्र,समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात विश्वासाचा,शिक्षणाचा आणि सुरक्षित भविष्याचा दिवा प्रज्वलित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पानगाव येथील पारधी वस्तीवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीतून हाच संदेश अधोरेखित झाला.
नागरिकांच्या व्यथा जाणून घेणे, त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या निवारणाची ग्वाही देणे,मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे आणि दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत वाटून घेणे,या सर्व बाबींमुळे ही भेट पारधी बांधवांसाठी संस्मरणीय ठरली.
प्रशासन केवळ शासकीय कार्यालयांपुरते मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आहे,याची प्रचिती या भेटीतून आली.दिवाळीच्या प्रकाशपर्वात पानगावच्या पारधी वस्तीवर पेटलेला हा आशेचा दिवा त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षा अधिक बळकट करणारा ठरला.