
चिंचपूर (ढगे) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद
- रोजगार,चारा आणि पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य;
- टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समुपदेशन
- मानसिक आधारासह शाश्वत शेतीचे मार्गदर्शन
वीज,रोजगार,अतिवृष्टी अनुदान आणि सामाजिक सुरक्षा पेन्शनसाठी ग्रामस्थांनी मांडल्या मागण्या
धाराशिव – आभाळाने साथ सोडली, शेतातील पिके संकटात सापडली आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला,तरी बळीराजाने आशा सोडू नये.दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी,शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबे एकटी नाहीत.त्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागात रोजगार व उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे,जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,असा विश्वास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केला.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर कॅम्पसच्या वतीने अतिवृष्टी व कोरडा दुष्काळ संशोधन प्रकल्पांतर्गत भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी,शेतीतील नुकसान, शेतकऱ्यांच्या मनातील चिंता, महिलांच्या उपजीविकेचे प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि शाश्वत शेतीच्या उपाययोजना यांवर या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.विशेष म्हणजे,केवळ सभागृहातील चर्चेपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता संशोधन प्रकल्पाच्या पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे.शेतकरी,शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांनी रोजगार व उपजीविकेशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे,त्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण,चारा-पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याला विशेष महत्त्व आहे.
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या असल्याने शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर व कष्टकरी कुटुंबांच्या अडचणींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.संकटाच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर कॅम्पसच्या वतीने सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पाचे, शेतकरी संवादाचे आणि जनजागृतीच्या कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यासाठी शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे यांनी दुष्काळाच्या काळात शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीच्या उत्पादनावर किंवा उत्पन्नावर होत नाही,तर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर आणि भावनिक स्वास्थ्यावरही होऊ शकतो.शेतीतील नुकसान,वाढत्या आर्थिक अडचणी आणि भविष्याची अनिश्चितता यांमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली येऊ शकतात.अशा परिस्थितीत मनातील चिंता दडपून न ठेवता ती मोकळेपणाने व्यक्त करणे, कुटुंबीयांशी आणि विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे तसेच गरज भासल्यास मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि कोहीजन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने शेतकरी व शेतमजुरांसाठी संवाद हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.या हेल्पलाईनच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना आपल्या समस्या मांडण्यासाठी,संवाद साधण्यासाठी आणि मानसिक आधार मिळविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रा.राक्षसे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाचा अभ्यास केवळ आकडेवारी आणि अहवालांपुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अडचणी समजून घेण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधन प्रकल्प पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. शेतातील नुकसान,पाणीटंचाई, आर्थिक अनिश्चितता आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यांमुळे निर्माण होणारा मानसिक ताण समजून घेत शेतकऱ्यांना समुपदेशन,भावनिक आधार आणि सकारात्मक मार्गदर्शन करण्यात आले.
संकट कितीही मोठे असले तरी मनातील चिंता मोकळेपणाने व्यक्त करणे,कुटुंबीयांशी संवाद साधणे, एकमेकांना आधार देणे आणि गरजेनुसार मदत घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रकल्प पथकाने पटवून दिले.शेतकऱ्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या मनात नव्याने आशेचा विश्वास निर्माण करणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
संशोधनासोबतच गरजू घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या मनातील व्यथा जाणून घेण्याच्या या उपक्रमामुळे शेतकरी संवादाला मानवी संवेदनांचा स्पर्श लाभला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रातील जल व भूमी तज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांनी शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.मातीची सुपीकता,जमिनीची जलधारण क्षमता आणि पाण्याची उपलब्धता या बाबी शेतीच्या दीर्घकालीन शाश्वततेशी निगडित आहेत.रासायनिक खतांचा अतिरेकी आणि असंतुलित वापर, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण तसेच मातीची रचना या बाबी जमिनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात,असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करावे.शेणखत,कंपोस्ट यांसारख्या सेंद्रिय स्रोतांचा योग्य वापर करून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा.मृद् व जलसंधारणाच्या उपाययोजना राबवून जमिनीची जलधारण क्षमता वाढवावी.पाण्याची बचत करावी आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून पीक नियोजन करावे,असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळासारख्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना जमिनीची सुपीकता टिकविणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांच्या संघर्षशील वृत्तीचा गौरव केला.धाराशिव जिल्ह्याने आजवर अनेक नैसर्गिक आणि सामाजिक संकटांचा सामना केला आहे. १९९३ चा विनाशकारी भूकंप, २००३–२००४ मधील कोरडा दुष्काळ,२०१९–२०२० मधील कोविड महामारी,सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि २०२६ मधील कोरडा दुष्काळ अशा एकामागून एक आलेल्या प्रतिकूल परिस्थितींना जिल्ह्यातील जनतेने मोठ्या धैर्याने तोंड दिले आहे.या प्रत्येक संकटात जिद्द,परस्पर सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर उभे राहण्याची ताकद धाराशिवकरांनी दाखवून दिली आहे,असे त्यांनी सांगितले.
चादरे यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घालताना सांगितले, धाराशिवचा बळीराजा संकटांनी खचून जाणारा नाही,तर संकटांशी दोन हात करून नव्या उमेदीने उभा राहणारा आहे.आभाळाने साथ सोडली म्हणून आशा सोडू नका.पिकांचे नुकसान झाले किंवा परिस्थिती कठीण झाली,तरी मनाने खचू नका.एकमेकांना आधार द्या,मनातील अडचणी मोकळेपणाने मांडा आणि उपलब्ध मदतीचा लाभ घ्या.शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांनो,तुम्ही एकटे नाही.जिल्हा प्रशासन,टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था तुमच्या सोबत आहेत.तुमचे जीवन अनमोल आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेत धैर्याने पुढे चला.
या संवाद कार्यक्रमात चिंचपूर (ढगे) येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या
जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.शेतीसाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पात्र शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.
दुष्काळामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.शेतीतील नुकसान आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळणारी मदत गरजू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे या चर्चेतून पुढे आले.
शेतकरी संवाद कार्यक्रमात महिलांनीही सक्रिय सहभाग घेत आपल्या अडचणी मांडल्या. गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर पात्र आणि गरजू महिलांना सामाजिक सुरक्षा पेन्शनचा लाभ मिळावा,अशी मागणीही महिलांनी केली.ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न,कुटुंबाच्या उपजीविकेतील त्यांचे योगदान आणि सामाजिक सुरक्षा योजनांची गरज या संवादातून अधोरेखित झाली.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना पुरेशा नसून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण,पाणी आणि चाऱ्याचे नियोजन,शाश्वत शेतीचा अवलंब, रोजगाराच्या संधी आणि मानसिक आरोग्याची काळजी या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
जिल्हा प्रशासन,टाटा सामाजिक विज्ञान संस्था,सामाजिक संघटना आणि स्थानिक समुदाय यांच्या समन्वयातून शेतकरी व कष्टकरी कुटुंबांपर्यंत शासकीय योजनांची माहिती,आवश्यक मार्गदर्शन आणि मानसिक आधार पोहोचविण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे,त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि संकटाच्या काळात त्यांना मानसिक बळ देणे,हा या उपक्रमाचा विशेष पैलू ठरला.
एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांसमोर उभ्या राहिलेल्या समस्या,तर दुसरीकडे त्यावर मात करण्यासाठी प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांकडून सुरू असलेले प्रयत्न,असे चित्र चिंचपूर (ढगे) येथील संवादातून समोर आले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मनातील चिंता ऐकून घेण्याबरोबरच त्यांच्या उपजीविकेला आधार देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे,उपविभागीय अधिकारी श्रीमती चव्हाण,जल व भूमी तज्ज्ञ डॉ.नितीन पाटील, प्रकल्प समन्वयक गणेश चादरे, प्रकल्प सदस्य नितीश कुमार, सतीश तांबे,तहसीलदार जयवंत पाटील,गटविकास अधिकारी, सरपंच तसेच शेतकरी,महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.