श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२६


तुळजापूर – कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता आज अन्नदान महाप्रसादाने झाली. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून विविध धार्मिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.


दिनांक ३ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला होता.त्यानंतर दि.११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना,दि. २० ऑक्टोबर रोजी दसरा आणि दि.२१ ऑक्टोबर रोजी पहाटे देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला.
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह श्री तुळजाभवानी देवींची छबीना मिरवणूक काढण्यात आली. तसेच,महंत वाकोजीबुवा यांच्याकडून प्रथा-परंपरेनुसार जोगवा मागण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील,पोलीस निरीक्षक बालाजी येवते, लेखाधिकारी संतोष भेंकी,सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील,सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे,सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले,रामेश्वर वाले,महंत तुकोजीबुवा,महंत वाकोजीबुवा, पुजारी,सेवेकरी,मानकरी आणि भाविक उपस्थित होते.
मंगळवार अन्नदान महाप्रसादाने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. आज रात्री देखील सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह श्री तुळजाभवानी देवींची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.