छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) छाननी करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत दाखल झालेल्या एकूण ६२ उमेदवारी अर्जांपैकी ८ अर्ज बाद, तर ५४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शपथपत्रातील चुका, अपूर्ण माहिती तसेच विविध कागदपत्रांतील त्रुटींमुळे संबंधित उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे.
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये सय्यद मुजीब उर रहमान सय्यद अतीक उर रहमान, फिरोजखान युसूफखान पठाण, अजय अरोरा, नीलम खेमणार, जनार्धन सोरमारे, धवलसिंह लावंड, सतीश चव्हाण (अपक्ष) आणि सिद्दीकी मो. अशफाकुल हसन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
छाननीनंतर ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहण्यास पात्र ठरले आहेत. मात्र, वैध अर्जांची संख्या ५४ असली तरी अंतिम उमेदवारांची संख्या एवढीच राहणार नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या मुदतीत किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ९ ऑक्टोबरनंतर अंतिम उमेदवारांची संख्या आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांमध्येही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारांची संख्या किती राहते आणि कोणत्या उमेदवारांमध्ये थेट लढत रंगते, याकडे मराठवाड्यातील पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे.