दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक

Spread the love

धाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामात सेवाभावी संस्था व व्यक्तींनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये नदी-नाले रुंदीकरण व खोलीकरण,तलावातील गाळ काढणे, तलाव खोलीकरण,जुने सिमेंट नाला बांध व कोल्हापुरी बंधारे यांची गळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करणे,नव्याने सिमेंट बंधारे बांधणे,विहीर पुनर्भरण करणे तसेच पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे करणे,अशा उपाययोजनांचा समावेश आहे.ही कामे लोकसहभागातून अधिक व्यापक स्वरूपात उभी राहावीत,यासाठी विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुष्काळाचा सर्वाधिक फटका पाण्याच्या उपलब्धतेला बसतो.अशा वेळी एखाद्या कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही केवळ सुविधा राहत नाही, तर ती दैनंदिन जगण्याची गरज बनते.याच पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जनावरांसाठी आणि माणसांसाठी पाणपोई उभारणे तसेच चारा पुरविणे,या कामांसाठीही इच्छुक सेवाभावी संस्थांनी पुढे यावे,अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दुष्काळाचे परिणाम केवळ शेती,पाणी आणि पशुधनापुरते मर्यादित राहत नाहीत. या परिस्थितीचा सामना करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधाराचीही गरज भासू शकते.त्यामुळे दुष्काळाने प्रभावित व्यक्तींना समुपदेशनाची गरज असल्यास समुपदेशक पुरविण्यासाठी संस्था आणि महाविद्यालयांनीही सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.अशा प्रकारचा सहभाग दुष्काळग्रस्त नागरिकांना कठीण काळात मानसिक बळ देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

या सर्व कामांसाठी जिल्ह्यातील सेवाभावी संस्था कोणत्या स्वरूपाची सेवा देऊ शकतात,याबाबत चर्चा आणि समन्वय करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार,दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

दुष्काळासारख्या संकटाचा सामना केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर नव्हे,तर प्रशासन आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नातून अधिक परिणामकारकपणे करता येतो.जलसंधारणासाठी श्रम आणि संसाधने,तहानलेल्या माणसांसह मुक्या जनावरांसाठी पाणी,पशुधनासाठी चारा आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींसाठी मानसिक आधार अशा विविध पातळ्यांवर समाजातील सेवाभावी हात पुढे आल्यास दुष्काळाच्या झळा निश्चितच कमी करता येतील,हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी या बैठकीत सहभागी होऊन दुष्काळ निवारणाच्या सामूहिक प्रयत्नांना बळ द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री.कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

  • Related Posts

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर…

    धाराशिव नगरपालिकेच्या कचरावेचकांसाठी व्यावसायिक सुरक्षितता व कौशल्यवृद्धी प्रशिक्षण संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : NSKFDC (National Safai Karamcharis Finance & Development Corporation) यांच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत धाराशिव नगरपालिका हद्दीतील कचरावेचकांसाठी व्यावसायिक सुरक्षितता व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *