५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी
धाराशिव – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोग संक्रमण शून्यावर’ आणण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागातील १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन तब्बल ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २ हजार ५७२ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये ६१२ सांसर्गिक रुग्ण,६१ बालरुग्ण, ग्रेड-१ विकृती असलेले ३७ रुग्ण तसेच ग्रेड-२ विकृती असलेला एक रुग्ण आढळून आला आहे.
ग्रेड-१ विकृतीमध्ये प्रामुख्याने तळहात किंवा तळपायाला बधिरता येते,तर ग्रेड-२ विकृतीमध्ये दिसणारी शारीरिक विकृती आढळते. ग्रेड-२ विकृती असलेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असून,ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यात आला होता.
मागील पाच वर्षांत निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील ५९१ गावांची निवड करण्यात आली असून,एकूण २१ हजार ३४१ सहवासितांची तपासणी केली जाणार आहे.
नवीन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करून कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी पात्र सहवासितांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) अंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देण्यात येणार आहे.सहवासितांना औषध देण्यापूर्वी आवश्यक तपासणी व वैद्यकीय निकषांची पूर्तता करण्यात येईल.कुष्ठरोगाच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना सिंगल-डोस रिफॅम्पिसिन देणे ही संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे.
३८६ गावांमध्ये ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’
मागील पाच वर्षांत सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण किंवा विकृती असलेले रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’ (Focused Leprosy Campaign) अंतर्गत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागांची निवड करण्यात आली आहे.मोहिमेत १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.यामध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची पुढील तपासणी केली जाईल.