
‘सेवा संकल्प अभियानांतर्गत स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा ; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांची दिली माहिती
धाराशिव – स्पर्धा परीक्षेतील यशासाठी केवळ दीर्घकाळ अभ्यास करण्यापेक्षा ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.योग्य नियोजनातून अभ्यास केल्यास एकाच वर्षातही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पदासाठी निवड होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर केंद्रित करावे. मोबाईलचा अनावश्यक वापर हा अभ्यासातील मोठा अडथळा मानून त्याचा कमीत कमी वापर करावा.मोठे स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी कठोर मेहनत, आत्मविश्वास आणि बदलत्या काळाचे भान ठेवून तयारी करावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती व विविध योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री.गुरव म्हणाले,कोणतेही ध्येय संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे.विद्यार्थीदशेतील हा महत्त्वाचा काळ असून या काळात प्रचंड मेहनत घेऊन येत्या एक-दोन वर्षांत आपले ध्येय साध्य करण्याचा निर्धार करावा. येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.जग आणि करिअरच्या संधी वेगाने बदलत आहेत.त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा विचार करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.मोठे स्वप्न पाहावे आणि त्या दिशेने कठोर मेहनत करावी.स्पर्धा परीक्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास प्रश्नांचे स्वरूप आणि परीक्षेची दिशा समजते.त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाते.त्याचबरोबर ‘योजना’, ‘लोकराज्य’ ही मासिके आणि विविध मोठी वृत्तपत्रे नियमित वाचावीत. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून सातत्याने पुढील वाटचाल करावी,असेही त्यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देताना श्री.ताकभाते म्हणाले की,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यरत आहे. शंभर मुले आणि शंभर मुलींसाठी दोन निवासी वसतिगृहे जिल्ह्यात असून तेथे निवास,भोजन व निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिल्या जातो.मुलींसाठी स्वच्छता भत्त्याचीही सुविधा आहे.मुलांना प्रतिमहिना ५ हजार रुपये,तर मुलींना ५ हजार ३०० रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी लाभ दिला जातो.प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करता येतो.गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी खोली करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजनेतून सहाय्य दिले जाते.विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनाही राबविण्यात येतात.
धनगर समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नामांकित विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश देण्याची योजना असून त्यामध्ये भोजन,निवास, गणवेश आणि पुस्तके मोफत दिली जातात.विमुक्त जाती व भटक्या जमातीतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात आश्रमशाळांची सुविधाही उपलब्ध आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील युवकांना विविध उद्योग-व्यवसाय सुरू करता यावेत,यासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी संबंधित आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असल्याचे श्री.ताकभाते यांनी सांगितले.
समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देताना समाज कल्याण निरीक्षक श्री. मुकटे यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्यांच्यासाठी स्वाधार योजना उपलब्ध आहे.तसेच भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप योजना असून समाज कल्याण विभागाच्या अन्य विविध योजनांचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यासाठी ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असून ते स्पर्धा परीक्षांची अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करतील.विविध शिष्यवृत्ती योजनांचा स्वतः लाभ घेण्याबरोबरच इतर पात्र विद्यार्थ्यांपर्यंतही या योजनांची माहिती पोहोचवतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी मानले.या मार्गदर्शन कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.