मेडसिंग्याच्या मनोज जाधव यांचा अनोखा निर्णय; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात करणार विसर्जन

धाराशिव प्रतिनिधी : मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना गणेश विसर्जनासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर कशासाठी? या प्रश्नाला कृतीतून उत्तर देण्याचा निर्धार धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील मनोज जाधव यांनी केला आहे. “मराठवाड्यात पाणी नाही, म्हणून गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे…” अशी भूमिका घेत त्यांनी आपल्या घरातील श्री गणपतीची मूर्ती थेट मुंबईला नेऊन अरबी समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पाणी बचतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मनोज जाधव यांनी आपल्या घरी विधिवत श्री गणपतीची स्थापना केली आहे. मात्र, मराठवाड्यातील पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणे टाळावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यातूनच ‘पाणी वाचवा, पर्यावरण जपा’ हा संदेश देण्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे.
18 सप्टेंबर रोजी सायंकाळी मेडसिंग्याहून मुंबईकडे प्रस्थान करून धाराशिव–बार्शी–कुर्डूवाडी–टेंभुर्णी–इंदापूर–भिगवण–हडपसर–पुणे मार्गे मुंबई गाठण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन, लागू असलेल्या नियमांचे पालन करत श्री गणपती मूर्तीचे अरबी समुद्रात विसर्जन करण्याचा त्यांचा मानस आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ वेगळेपणासाठी नसून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असला तरी त्यासोबत सामाजिक जबाबदारीही जपली पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
यासाठी मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन आवश्यक प्रशासकीय मार्गदर्शन व सहकार्याची मागणी केली आहे. प्रवासादरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच शासन आणि संबंधित स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
मराठवाड्यात पाण्याची टंचाई असताना गणपती विसर्जनासाठी समुद्र गाठण्याचा हा निर्णय कितपत वेगळा संदेश देतो, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. श्रद्धा कायम ठेवत पाण्याची बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याने या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.