पोलिसांची सतर्कता व गाडीवाली भाभीच्या मदतीने ऑपरेशन मुस्कान यशस्वी
BTS-V या कोरियन सिंगर डान्स ग्रुपच्या बनल्या फॅन
दक्षिण कोरियाला जाण्याचा आखला होता बेत
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) – तीन अल्पवयीन शालेय मुलींनी एसटी बस प्रवासात शेजारील शीटच्या एका महिलेच्या फोनवरून फोन करून आमचे अपहरण झाले असल्याचा बनाव केला. पोलिसांनी आलेल्या फोनचे लोकेशन घेऊन संबंधित बस स्टँडवरील गाड्यावर फळे विक्रेत्या भाभीशी संपर्क साधून त्यांना त्या मुलींना अडवून ठेवण्यास सांगितले. त्या भाभींनी देखील लागलीच कामगिरी चोख बजावली. तर पोलिसांनी जाऊन त्या अल्पवयीन मुलींना आणून सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही यशस्वी कामगिरी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या २५ मिनिटांत दि.२७ डिसेंबर रोजी पार पाडली. दरम्यान, गुन्ह्याची माहिती मिळाल्यापासून अवघ्या २५ व्या मिनिटाला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून यूट्यूब (Youtube) व इन्स्ट्राग्राम (instagram) वरील BTS-V या कोरियन सिंगर डान्स ग्रुपचे फॅन असल्यामुळे पुण्याला पळून जायचे व पैसे कमवून दक्षिण कोरियाला जाऊन BTS-V या ग्रुपला कसल्याही परिस्थितीत भेटायचेच असे ठरवून कोणालाही काही एक न सांगता पळून गेलेल्या ११ वर्षांच्या २ मुली व १३ वर्षाची १ मुलगी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४२ वाजण्याच्या सुमारास उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात निळू नगर तांड्यावरील ३ अल्पवयीन शाळकरी मुलींची शाळा सुटल्यानंतर त्यांना एका पिवळ्या रंगाच्या स्कूलबसमधून काही लोक अपहरण करून घेऊन गेले आहेत. त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून चाकूचा धाक दाखवून त्यांना नेले असल्याचे Multi Disciplinary Team (MDT) वर उमरगा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोकॉ योगेश बिराजदार यांना बसमध्ये प्रवास करीत असलेल्या बसच्या सीटवरील एका महिलेच्या फोनवरून कॉल करून सांगितले. बिराजदार यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठांना कळविली. उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सर्व दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना बोलवून मिळालेली माहिती सांगून सूचना दिल्या. तर बिराजदार यांना लागलीच फोन करून तुम्हाला अपहरणाची गोष्ट कशी समजली ? याबाबत फोनवर विचारपूस केली असता त्यावेळी त्यांनी एका फोनवरून माझी मुलगी लक्ष्मी हिनेच ही गोष्ट मला कळविली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनेच्या तपासाबाबत सल्लामसलत करून कॉल करणाऱ्या व्यक्तीकडे आलेला फोन नंबर हस्तगत करून त्या मोबाईल नंबरचे तातडीने लोकेशन काढले. बिराजदार यांची अल्पवयीन मुलीने ज्या नंबरवरून अपहरणाची माहिती दिली. त्या मोबाईल फोनचे लोकेशन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ दर्शवीत असल्यामुळे पोलिसांनी सदर अनोळखी फोन नंबरवर कॉल केला. फोन केल्यानंतर तो फोन एका महिलेने उचलला असता या फोनवरून कुठल्या मुलीने फोन केला होता का ? अशी विचारणा केली असता माझ्या शेजारी १२-१३ वर्षाच्या बसलेल्या मुलीने मला एक फोन करायचे आहे म्हणून माझा फोन घेतला होता असे सांगितले. तेव्हा बस कुठली आहे, स्कूल बस आहे का ? असे विचारले असता त्यांनी पुण्याला जाणारी एसटी बस आहे असे सांगताच बीट अंमलदार अनिरुद्ध कावळे यांना तात्काळ उमरगा बस स्थानकातून पुण्याला जाणारी बस किती वाजता जाते आणि ती आता कुठे असेल ? तसेच बस स्टॅडवर ३ लहान मुली आज दिवसभरात कोणी बघितल्या का ? याची माहिती घेण्यास सांगितले. त्यामुळे कावळे यांनी बस स्थानकात जाऊन १० मिनिटांतच वरील सर्व माहिती घेऊन पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की बस स्टॅन्डवरून पुण्याला जाणारी बस दुपारी २ वाजता सुटते व ती आता साधारणतः मोहोळच्या आसपास असेल. तसेच आज सकाळपासून दुपारपर्यंत ३ लहान मुली बसची वाट पहात बसलेल्या होत्या अशी माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी लागलीच मोहोळ बस स्टॅन्ड येथे गाड्यावर काम करणाऱ्या पोलिसांच्या परिचयाच्या आदम भाभी यांना फोन करून ३ लहान मुली मोहोळ बस स्टैंड वर दिसल्यास त्यांना तात्काळ थांबवून ठेवावे असे सांगितले. थोड्या वेळाने आदम भाभींनी आम्हाला ३ लहान मुली एका बसमधून उतरलेल्या आहेत व रस्त्याची विचारपूस करीत पंढरपूर रोडकडे निघाले आहेत असे सांगितले. पोलिसांनी त्या तिन्ही मुलींना कृपया स्टँडवरच थांबून ठेवा असे सांगितले. त्यामुळे भाभींनी बाजूस उभ्या असलेल्या एका व्यक्तीस त्या मुलींना थांबवण्यास व पुन्हा स्टॅंडवर घेऊन येण्यास सांगितले. तेवढ्या वेळात पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती कळवून तेथील २ पोलीस कर्मचारी मोहोळ बस स्टॅन्ड येथे पाठवून दिले. त्यांना उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोहोळ येथील बस स्टॅण्डवरील आदम भाभीचा फोन नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन मोहोळ पोलीस स्टेशन येथे घेऊन येण्यास सांगितले. मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. त्यानंतर उमरगा पोलीस ठाण्यातून पोलीस पार्टी गाडी व तिन्ही मुलींच्या पालकांना मोहोळ पोलीस ठाण्यात पाठवून सुखरूपरित्या उमरगा येथे घेऊन येण्यास रवाना केले. उमरगा येथील पोलीस पार्टी गाडीने मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन मुलींना ताब्यात घेऊन उमरगा येथे येऊन मुलींना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले.
या मुलींच्या अपहरणाची माहिती मिळताच सपोनि तायवाडे यांनी तातडीने मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले. तर सपोनि कन्हेरे यांनी पंढरपूर टोल नाका येथे संपर्क साधून तेथील कर्मचाऱ्यांना पिवळ्या रंगाची स्कूलबस टोलनाक्यावर आल्यास त्यास तपासून त्यामधील ३ अल्पवयीन मुली आढळून आल्यास बस पुढे जाऊ न देता आमच्याशी संपर्क करावा असे सांगितले. तसेच पोउपनि पुजरवाड यांनी उमरगा पोलीस सोबत मुलींची ओळख पटवणाऱ्या वस्तू कपडे व आधार कार्ड याची माहिती घेऊन मोहोळ बस स्टॅन्ड येथील आदम भाभी व पोलिसांना तात्काळ पाठविले. तर पोना अनिरुद्ध कावळे व पोका योगेश बिराजदार यांनी MDT कॉल तात्काळ कळवून उमरगा बस स्टँड येथे जाऊन मुली बस स्टॅडवर होत्या का व कुठल्या बसने गेल्या ? याची माहिती अचूकपणे मिळवून पोलिसांना दिली. अशा प्रकारे MDT कॉल वरून आलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यापासून अवघ्या २५ व्या मिनिटाला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून यूट्यूब (Youtube) व इन्स्ट्राग्राम (instagram) वरील BTS-V या कोरियन सिंगर डान्स ग्रुपचे फॅन असल्यामुळे पुण्याला पळून जायचे व पैसे कमवून दक्षिण कोरियाला जाऊन BTS-V या ग्रुपला कसल्याही परिस्थितीत भेटायचेच असे ठरवून कोणालाही काही एक न सांगता पळून गेलेल्या ११ वर्षांच्या २ मुली व १३ वर्षाची १ मुलगी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. ही धडाकेबाज पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पिराजी तायवाडे, सपोनि कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, पोना अनिरुद्ध कावळे, पोकॉ योगेश बिराजदार बळीराम सोनटक्के यांनी केली.