कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी; दोन बोगद्यांची कामे बंद, मिरगव्हाण पंपगृहाचे ४० टक्के काम अपूर्ण

धाराशिव – : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत नीरा-भीमा जोड बोगदा आणि जेऊर बोगद्याची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करावीत, तसेच मिरगव्हाण पंपगृहाच्या कामाला गती देऊन धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना त्यांच्या हक्काचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. अपूर्ण कामे तातडीने सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील नीरा-भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर उपस्थित होते. या पाहणीत दोन्ही बोगद्यांची कामे बंद असल्याचे, तर मिरगव्हाण पंपगृहाचे कामही संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले.

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून ७ टीएमसी पाणी २३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा-भीमा बोगद्याद्वारे उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यानंतर त्यापैकी ५.३२ टीएमसी पाणी करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून २६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तेथून ३.०८ टीएमसी पाणी उपसा करून सीना-कोळेगाव जलाशयात, तर २.२४ टीएमसी पाणी बंद नलिका गुरुत्व वाहिनीद्वारे सीना नदीत सोडण्याचे नियोजन आहे.
नीरा-भीमा बोगद्याचे काम जून २०२३ पासून बंद
नीरा-भीमा बोगद्याचे एकूण २३.६८ किलोमीटरपैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. मात्र, चार ठिकाणी मिळून २.६९ किलोमीटर काम अद्याप बाकी आहे. उद्धट बंधाऱ्याच्या बाजूला सुरुवातीचे १.०८ किलोमीटर ओपनकट आणि त्यापुढील ८०० मीटर बोगद्याचे काम अपूर्ण आहे. तसेच उजनीच्या बाजूला भादलवाडीजवळ ४४८ मीटर बोगदा आणि शेवटचे ३६० मीटर ओपनकटचे काम बाकी आहे. आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून हे काम बंद असल्याची बाब पाहणीत समोर आली. आता काम सुरू झाले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जेऊर बोगद्याचे कामही जुलै २०२४ पासून ठप्प
जेऊर बोगद्याचे २६.८५ किलोमीटरपैकी २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले असून, २.८८ किलोमीटर खोदकाम अद्याप बाकी आहे. दहिगाव येथे उजनीतून पाणी घेण्यासाठीची प्रवेश संरचनाच अपूर्ण आहे. दहिगाव ते जेऊरदरम्यान सुमारे २.७१ किलोमीटर खोदकाम बाकी आहे. कोंढेज-सरपडोहदरम्यान २७ मीटर, तर मिरगव्हाणजवळ सीना नदीच्या बाजूला १३३ मीटर खोदकाम करणे बाकी आहे. या बोगद्याचे काम २७ जुलै २०२४ पासून बंद पडले आहे.

मिरगव्हाण पंपगृहाचे ४० टक्के काम अपूर्ण
मिरगव्हाण येथील पंपगृहासाठी प्रत्येकी १,९४० अश्वशक्तीचे सात पंप बसविण्यात येणार असून, त्यांची एकूण क्षमता १३ हजार ५८० एचपी इतकी आहे. या कामासाठी १११.५८ कोटी रुपयांची तरतूद आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्के काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
या तिन्ही कामांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. नीरा-भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय ७ टीएमसी पाणी उजनीत येणार नाही. जेऊर बोगदा पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी मिरगव्हाणपर्यंत पोहोचणार नाही आणि पंपगृहाचे काम पूर्ण झाल्याशिवाय सीना-कोळेगाव जलाशयात पाणी आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची साखळीच रखडल्याने धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेली दोन्ही बोगद्यांची कामे तातडीने सुरू करावीत, पंपगृहाच्या कामाला गती द्यावी आणि प्रकल्पासाठी आवश्यक निधी व आर्थिक नियोजन करून हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली. अन्यथा शेतकरी आणि जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीवेळी मकरंद राजे निंबाळकर, शिवाजी दादा सरडे, जिल्हा परिषद सदस्य सातपुते, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, सौदागर जगताप, राणा बनसोडे, राहुल पाटील, शौकत शेख, सुनील गरड, दयानंद थोरात, राकेश सूर्यवंशी, अमोल मुळे, मनोज पडवळ, अर्जुन पाटील, अभिराज कदम, राज जाधव, अशोक साळुंके तसेच कार्यकारी अभियंता नाईक, घनवट आदी उपस्थित होते.