तेरखेड्यातील फटाका कारखान्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय; भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मिळणार तातडीची मदत
धाराशिव (प्रतिनिधी) – : वाशी नगरपंचायत आणि संपूर्ण वाशी तालुक्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, वाशी तालुक्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला मंजुरी मिळाली आहे. आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव फटाका उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या परिसरात फटाके तयार करणारे अनेक कारखाने कार्यरत आहेत. फटाका उत्पादनासारख्या संवेदनशील व्यवसायाच्या ठिकाणी आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने अग्निशमन दलाची मदत उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वाशी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन वाहन उपलब्ध होण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
यापूर्वी येडशी येथे घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. या दुर्घटनेने जिल्ह्यात सक्षम अग्निशमन यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित केली होती.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी वाशी तालुक्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने घेत संबंधित स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर अग्निशमन दलाच्या वाहनाला मंजुरी मिळाली आहे.
ही मंजुरी केवळ एका वाहनापुरती मर्यादित नसून, भविष्यात आग, औद्योगिक दुर्घटना तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः तेरखेडा परिसरातील फटाका कारखाने आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.