
धाराशिव : तालुक्यातील येडशी येथील भीषण आगीच्या दुर्घटनेत करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र, सक्षम आणि तातडीने प्रतिसाद देणारी अग्निशमन यंत्रणा आणि त्याचे स्पष्ट धोरण तयार करण्यात यावे या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या करंडे कुटुंबातील वारसांना विशेष आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी विनंती देखील मान्य केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे ९ नोव्हेंबर रोजी पहाटे करंडे कुटुंबाच्या घरवजा दुकानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन बालके आणि दोन ज्येष्ठ नागरिकांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः घटनास्थळी धाव घेतली, सुरुवातीला धाराशिवहून आलेला एकच अग्निशमन बंब उपलब्ध होता. आगीची तीव्रता लक्षात घेऊन तुळजापूर आणि कळंब येथून अतिरिक्त अग्निशमन वाहने तातडीने मागवली. मात्र, अतिरिक्त यंत्रणा पोहोचेपर्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला होता.
या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित केल्या आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्रे नसल्याने आग लागल्यानंतर २५ ते ५० किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहने बोलवावी लागतात. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होतो.
या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागांतील अग्निशमन सुविधांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करून स्वतंत्र ग्रामीण अग्निशमन धोरण तयार करावे या आपल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तालुका स्तरावर आणि प्रमुख ग्रामीण केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार सुसज्ज अग्निशमन केंद्रे, आधुनिक वाहने, प्रशिक्षित कर्मचारी आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा उभारणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ग्रामीण अग्निशमनासाठी स्वतंत्र निधी तसेच आवश्यक पाणीसाठ्याची तरतूदही केली जावी असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेल्या अग्निशमन वाहनांच्या प्रस्तावांचाही तातडीने आढावा घेऊन त्यावर कालमर्यादेत निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत. तसेच नागरी भागांतील अग्निशमन सुविधांचेही सर्वेक्षण करून आवश्यक वाहने आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे.
करंडे कुटुंबाला मदतीचा आधार
करंडे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची भरपाई कोणत्याही आर्थिक मदतीने होऊ शकत नाही. मात्र, कुटुंबातील सहा सदस्य गमावलेल्या वारसांना विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक सहाय्य द्यावे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक शेरा देत ‘ मदत करा ‘ अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.