अ‍ॅड. अजित गुंड पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; धाराशिवमध्ये १२ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार, ३.५० कोटींची तरतूद

Spread the love

(रुपामाता फाऊंडेशनच्या मागणीला नगरपरिषदेचा सकारात्मक प्रतिसाद)

धाराशिव  (प्रतिनिधी )शहरातील महिलांची सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रुपामाता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे. फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड. अजित गुंड पाटील यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत धाराशिव नगरपरिषदेने शहरातील १२ महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन केले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२६ रोजी रुपामाता फाऊंडेशनच्या वतीने धाराशिव नगरपरिषदेकडे महिलांसाठी स्वतंत्र व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ४ मे २०२६ रोजी फाऊंडेशनच्या वतीने दुसरे स्मरणपत्र देऊन या मागणीचा आग्रह धरण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठा, शासकीय कार्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दररोज हजारो महिला व विद्यार्थिनींना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

या मागणीची दखल घेत धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड. अजित गुंड पाटील यांना लेखी पत्राद्वारे प्रस्तावित कार्यवाहीची माहिती दिली आहे. त्यानुसार शहरातील १२ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३ कोटी ५० लाख रुपयांची निधी तरतूद केली जाणार आहे.

नगरपरिषदेच्या नियोजनानुसार बार्शी नाका परिसर, गॅस गोडाऊनजवळ, लेडीज क्लब मैदानाजवळ, रामकृष्ण महाविद्यालय परिसर, महाराष्ट्र प्रताप चौक, जिल्हा न्यायालय परिसर, गणेशनगर आदींसह शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे.

नवीन स्वच्छतागृहे प्री-फॅब्रिकेटेड स्वरूपात उभारण्याचे नियोजन असून, त्यांची देखभाल व वापर सुलभ होईल, यावर भर देण्यात येणार आहे. प्रस्तावातील त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण करण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे.

महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला हा मूलभूत सुविधेचा प्रश्न रुपामाता फाऊंडेशनने जागतिक महिला दिनी प्रशासनासमोर मांडला. त्यानंतर स्मरणपत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना नगरपरिषदेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता प्रशासकीय स्तरावर गती मिळाली असून, धाराशिव शहरातील महिलांना सन्मानजनक, सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

  • Related Posts

    एन.व्ही.पी. शुगरकडून तिसऱ्या पंधरवाड्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाखांचे ऊस बिल खात्यावर जमा!

    Spread the love

    Spread the loveपंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण जागजी |(प्रतिनिधी) – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७…

    ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुढाकारातून ५ वर्षीय चिमुकल्याची डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत; चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!

    Spread the love

    Spread the loveउमरगा : समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, या सेवाभावी उद्देशाने ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *