तामलवाडीत दुष्काळग्रस्त भगिनींना ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी भेट

धाराशिव – दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता असली,तरी त्यांच्या घरातील दिवाळीचा आनंद कमी होऊ देणार नाही.संकट कितीही मोठे असले,तरी सरकार शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आगामी काळात दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर यंदा पावसाअभावी दुष्काळाचे संकट ओढवले आहे.या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असला, तरी सर्वांच्या सहकार्याने आपण निश्चितपणे दुष्काळावर मात करू. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपासून त्यांच्या बँक खात्यांत पाच हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.शासनाकडून शक्य तेवढी सर्व मदत करण्यात येईल.गरज पडेल तेव्हा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,असा विश्वास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

आज २ नोव्हेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दुष्काळग्रस्त कुटुंबांतील महिलांना ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी भेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि जय राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तामलवाडी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री श्री.सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले, दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येक कुटुंबाच्या अडचणींची शासनाला जाणीव आहे.दिवाळी हा आनंदाचा आणि आपुलकीचा सण आहे.या सणाच्या निमित्ताने दुष्काळग्रस्त कुटुंबांतील भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे,त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, या भावनेतून विविध प्रकारच्या जीवनावश्यक साहित्याचा समावेश असलेली दिवाळी भेट देण्यात येत आहे.ही केवळ मदत नसून,एका भावाने आपल्या बहिणीला प्रेमाने दिलेली दिवाळीची भेट आहे. भगिनींनी ती आपुलकीच्या भावनेतून स्वीकारावी.तुमच्या सुखदुःखात आणि प्रत्येक संकटात मी तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत राहीन.शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर आहे.दुष्काळाचे संकट मोठे असले,तरी कोणत्याही कुटुंबाने खचून जाऊ नये.सर्वांच्या सहकार्याने या संकटावर मात करून प्रत्येकाच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुष्काळग्रस्त कुटुंबांतील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी भेटीचे वितरण करण्यात आले. दिव्यांग विकास क्षीरसागर व बाळासाहेब जाधव यांच्यासह लक्ष्मी मगर, धनुबाई काळे,छाया शिंदे,मीरा काळे,संगीता डोलारे आणि अर्चना गवळी यांना मान्यवरांच्या हस्ते दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सणासाठी मिळालेली ही भेट लाभार्थी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरली. कार्यक्रमाला तामलवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दुष्काळाच्या चिंतेत असलेल्या भगिनींना दिवाळी भेट देताना पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आपुलकी आणि शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ५ हजार रुपये मदत जमा होत असल्यामुळे कार्यक्रमाला भावनिक स्पर्श लाभला.