जलाभिषेक आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल! अखेर रस्त्याचे काम थांबविण्याचे कंपनीला आदेश

Spread the love

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रम इन्फ्राटेक लिमिटेडला लेखी पत्र; मनोज जाधव यांचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित

‘हा माझा विजय नसून पत्रकार बांधवांनी या प्रश्नाला दिलेल्या न्यायाचा विजय!’ — मनोज जाधव

धाराशिव  (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेर–तुळजापूर–अक्कलकोट राज्य मार्गावरील केशेगाव ते तुळजापूर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी होणाऱ्या पाणी उपशाचा मुद्दा अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या प्रकरणी शेतकरी पुत्र तथा रुग्णसेवक मनोज जाधव यांनी दिलेले निवेदन आणि प्रस्तावित ‘जलाभिषेक आंदोलना’च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्ते बांधकाम कंपनीला लेखी पत्र देऊन कामकाज ‘सेफ स्टेज’मध्ये आणून तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

विक्रम इन्फ्राटेक लिमिटेड, पुणे या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता, धाराशिव यांनी लेखी पत्राद्वारे सदरील रस्त्याचे काम सुरक्षित टप्प्यावर (Safe Stage) आणून तात्काळ थांबविण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

२२ ऑक्टोबरच्या जलाभिषेक आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनोज जाधव यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. पाणी उपसा थांबविण्यासाठी सात दिवसांची मुदत देत कार्यवाही न झाल्यास २२ ऑक्टोबर रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ‘जलाभिषेक आंदोलन’ करण्याचा अंतिम इशाराही देण्यात आला होता.

या विषयाला स्थानिक पत्रकार बांधवांनी प्रिंट आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी देत जनहिताचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला लेखी पत्राद्वारे काम सुरक्षित टप्प्यावर आणून तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रशासकीय पत्राची दखल घेत मनोज जाधव यांनी २२ ऑक्टोबर रोजीचे प्रस्तावित जलाभिषेक आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील कार्यवाहीकडे लक्ष ठेवले जाणार आहे.

‘हा माझा विजय नाही, पत्रकार बांधवांच्या लेखणीचा विजय!’

या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज जाधव म्हणाले की, “हा निवेदनाचा किंवा आंदोलनाचा वैयक्तिक विजय नाही. हा जनहिताचा प्रश्न पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर मांडला आणि या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या पत्रकारितेचा हा विजय आहे. दुष्काळाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिक आणि मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण व्हावे, या प्रामाणिक उद्देशाने हा लढा उभारण्यात आला होता.”

ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला लेखी निर्देश दिल्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम थांबविण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी होते का, याकडे लक्ष ठेवण्यात येईल.

पत्रकारितेच्या एकजुटीची आणि जनहिताच्या प्रश्नाची दखल

दुष्काळी परिस्थितीत पाणी संवर्धनाचा प्रश्न उपस्थित करत दिलेले निवेदन, त्यानंतर माध्यमांनी केलेले वृत्तांकन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला दिलेले लेखी निर्देश यामुळे या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता संबंधित कंपनी प्रत्यक्षात कामकाज सुरक्षित टप्प्यावर आणून थांबविते का, तसेच स्थानिक जलसाठ्यांच्या संरक्षणाबाबत पुढील कोणती कार्यवाही होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“पाणी वाचवा, जनजीवन वाचवा! जनहिताच्या प्रश्नांसाठी पत्रकारितेची लेखणी आणि नागरिकांचा आवाज कायम बुलंद राहिला पाहिजे,” अशी भूमिका मनोज जाधव यांनी व्यक्त केली.

— मनोज जाधव
शेतकरी पुत्र तथा रुग्णसेवक, धाराशिव

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

    Spread the love

    Spread the loveशारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर…

    अमृत दुर्गोत्सव २०२६’मधून उलगडणार महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.१९ ऑक्टोबर (जिमाका) दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा,त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा वारसा साकारला जावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *