शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६
श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री क्षेत्र तुळजापूर येथे उत्साहात संपन्न झाला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाची मुक्त उधळण करत, पारंपरिक संबळाचा निनादात आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषात हा धार्मिक सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार पार पडला. या सोहळ्यानंतर देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ झाला असून, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी आश्विनी पौर्णिमेला पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होणार आहेत

पहाटे श्री तुळजाभवानी देवींची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला १०८ सुती साड्यांची पिळे (दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार करण्यात आले. देवीची मूर्ती पालखीत विराजमान करून अहिल्यानगर येथून आलेल्या मानाच्या पालखीतून सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर आणण्यात आली. देवीची पालखीतून मंदिराभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मंदिर परिसरातील पिंपळाच्या पारावर पालखी ठेवून देवीची आरती करण्यात आली. यावेळी साखरभाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या.

श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती असल्याने विजयादशमीच्या दिवशी देवी सिंहासनावरून उतरून भाविकांसमवेत सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर येते, अशी परंपरा आहे. या सोहळ्यादरम्यान मूर्तीला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी मूर्तीला १०८ सुती साड्यांची पिळे (दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार केले जाते. सीमोल्लंघन सोहळ्यादरम्यान भाविकांनी कुंकू व फुलांची उधळण करत ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष केला.
श्री तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ
धार्मिक परंपरेनुसार, महिषासुर या दैत्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला. या युद्धादरम्यान झालेल्या श्रमांनंतर देवी विश्रांतीसाठी मंचकी निद्रेला जाते, अशी श्रद्धा आहे. देवीच्या या निद्रेला ‘श्रमनिद्रा’ असे संबोधले जाते.

सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवीची मूर्ती सिंहाच्या गाभाऱ्यातील मानाच्या तेली लाकडी पलंगावर विराजमान करण्यात येते. देवीची ही श्रमनिद्रा सोमवार, दि. २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे.

या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सेवेकरी, मानकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.