
- दिवाळीच्या सुट्टीत साकारूया ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती
- सहभागी विद्यार्थ्यांसह नागरिकांना मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्र
- शाळा,महाविद्यालये,सामाजिक संस्था व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
अमृतचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी यांचे आवाहन
धाराशिव,दि.१९ ऑक्टोबर (जिमाका) दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा,त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा वारसा साकारला जावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थी,युवक आणि नागरिकांना आपल्या घरी,शाळेत किंवा परिसरात ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाशी नाते जोडण्याची अनोखी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे,या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अर्थात Academy of Maharashtra Research Upliftment and Training (AMRUT) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे,हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
दिवाळी म्हटली की आनंद,उत्साह,फराळ आणि सुट्ट्यांची पर्वणी ! मात्र,यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला मूर्त स्वरूप देण्याची संधी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी ऐतिहासिक वारशाशी जोडले जावे,गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यावा,तसेच पुढील पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची भावना निर्माण व्हावी,यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना विद्यार्थ्यांना त्यांची रचना,ऐतिहासिक महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीतील योगदान जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी,युवक आणि नागरिकांनी आपल्या घरी,शाळेत किंवा परिसरात महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात.प्रतिकृती तयार झाल्यानंतर त्यांची छायाचित्रे काढून अमृत दुर्गोत्सवच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.
या उपक्रमासाठी https://www.amrutdurgotsav.com हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.या संकेतस्थळावर प्रतिकृतींची छायाचित्रे अपलोड करून सहभाग नोंदविता येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचावा,यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालये, शिक्षक,पालक,विद्यार्थी,युवक मंडळे, सामाजिक संस्था,स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी,युवक आणि नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवावी.त्यांना ऐतिहासिक गड- किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच तयार केलेल्या प्रतिकृतींची छायाचित्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ दगड-मातीच्या ऐतिहासिक वास्तू नाहीत,तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे,स्वराज्याच्या संघर्षाचे,महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत.या गड-किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना इतिहासाची ओळख होईल.त्यांच्यामध्ये ऐतिहासिक वारशाविषयी जिव्हाळा, अभिमान आणि संवर्धनाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. दिवाळीच्या सुट्टीचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकाराव्यात. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित करावे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था,सामाजिक संस्था,स्वयंसेवी संघटना, युवक मंडळे आणि नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे,असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी यांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),जिल्हा कार्यालय, धाराशिव.पत्ता : ऋणानुबंध,तळ मजला, वृंदावन कॉलनी,जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव.
मुख्यालय : अमृत मुख्यालय,पुणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahaamrut.org.in
उपक्रमासाठी संकेतस्थळ : https://www.amrutdurgotsav.com
ई-मेल : info@mahaamrut.org.in
जिल्हा कार्यालय ई-मेल : amrut.dharashiv.dm@gmail.com
संपर्क क्रमांक : +९१-७३९१०६५४६९
इतिहासाचा अभिमान जपूया, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारूया आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचे संवर्धन करूया,या भावनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.