चार राज्यांच्या सीमा ओलांडून आरोपीचा प्रवास; पोलिसांनी कर्नाटकातून घेतले ताब्यात

धाराशिव : मालकाची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत कर्नाटकातून अटक केली. आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून प्रवास केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत त्याला जेरबंद केले.
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव शुभम धर्मराज सोमवंशी (वय २६ वर्षे) असे असून, त्यांची डोक्यात तसेच चेहऱ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धाराशिव येथून सोलापूर रेल्वे स्थानक, याडीगीर (कर्नाटक), हैदराबाद, निजामाबाद आणि खुपाट (तेलंगणा) परिसरातून प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सातत्याने ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत त्याला कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओडिसा येथील रहिवासी मोहम्मद वारीस सफील अन्सारी (वय १९ वर्षे) असे असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची सतर्कता, समन्वय आणि चिकाटी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद इज्जनवार, सपोनि सुदर्शन कसार, पोलीस शिपाई पठाण, पोलीस शिपाई औताडे, पोलीस हवालदार जावेद काझी, पोलीस हवालदार फरहान पठाण, पोलीस हवालदार दयानंद गोडके तसेच इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
— जनसंपर्क विभाग, धाराशिव पोलीस