गाळप क्षमता १२०० वरून २५०० TCD; विजयादशमीला आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव : रुपामाता नॅचरल शुगर्स युनिट क्र. ०१, पाडोळी येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गूळ पावडरच्या आठव्या गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ उत्साहात पार पडला. कारखान्याची गाळप क्षमता १००० TCD वरून २५०० TCD पर्यंत वाढविण्यात आली असून, रुपामाता परिवाराच्या औद्योगिक प्रगतीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
ह.भ.प. अॅड. पांडुरंग महाराज लोमटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी आणि रुपामाता परिवाराचे संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीचे पूजन करून नवीन गळीत हंगामाचा मोळी पुजन करून शुभारंभ करण्यात आला.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली आहे. वाढीव गाळप क्षमतेमुळे अधिक ऊस गाळप करण्याची संधी उपलब्ध झाली असून, यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज आहे. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस रुपामाता नॅचरल शुगर्सला पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक अॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी केले.
कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता, शेतकऱ्यांचे सहकार्य आणि योग्य नियोजन यांच्या माध्यमातून गळीत हंगाम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार आणि वाहतूकदार यांनी समन्वयाने काम करून कारखान्यास नियमित ऊस पुरवठा करावा, असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी कन्सल्टंट बसवेश्वर थळकरी, जनरल मॅनेजर एम. जी. राठोड, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, चीफ केमिस्ट दिगंबर आवताडे, सुरक्षा अधिकारी लोकरे, ओंकार निचळ, रुपामाता परिवारातील समर्थ वीर, विविध विभागांचे प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.