जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा

धाराशिव – नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली,पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,बसवेश्वर चौक ते बार्शी रोड मार्गे निघून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप झाला.विविध शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवा,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, शासकीय सेवांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश होता.
रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे,शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे,नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलतेने दखल घेतली जावी,ही लोकाभिमुख प्रशासनाची खरी ओळख आहे.सेवा संकल्प अभियान याच भावनेला बळ देणारे आहे.प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे,सेवा वितरणात गतिमानता आणणे आणि शासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे,या बाबींना अभियानाच्या माध्यमातून महत्त्व देण्यात येत आहे.