मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन

धाराशिव – मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन आजच्या संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही मात करूया,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.संकट कितीही मोठे असू दे,सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी प्रारंभी स्मृती स्तंभास पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. सुरुवातीला राष्ट्रीय गीत वंदे मातरम् झाले.पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थिताना संबोधित करताना पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नागनाथ कुंभार,शेषराज बनसोडे, गोविंद नलावडे,नागनाथ कुंभार, मनाबाई घोडके,तात्यासाहेब शिंदे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी सर्वश्री प्रवीण धरमकर,संतोष राऊत व स्वाती शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला,मात्र मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी आणखी १३ महिने आणि दोन दिवस संघर्ष करावा लागला.१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संघर्षात सामान्य जनतेनेही मोठ्या धैर्याने सहभाग घेतला. धाराशिव जिल्ह्यालाही या गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे,असे सरनाईक यांनी नमूद केले.
पाणीटंचाईवर प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पावसात दीर्घ खंड पडल्याने जिल्ह्यासमोर संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय विशेष पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात आले असून उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन केले जात आहे. नागरिकांसह पशुधनाला पाणी उपलब्ध राहावे यासाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर,अनधिकृत पाणीउपसा रोखणे आणि जलस्रोतांचे नियोजन यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरा,”हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता लोकचळवळ बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.नाला बांध,बंधारे, पाझर तलाव, सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास,शेततळी,सिमेंट नाला बांध आणि चेकडॅमच्या कामांना गती देऊन भूजलपातळी वाढविण्याचा दीर्घकालीन संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे.‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’च्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
कमी व्याजदरात कर्ज, नियमित कर्जफेडीस प्रोत्साहन, शेतीमालासाठी व्यापक बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे.
गुंतवणुकीतून रोजगारनिर्मितीला चालना
धाराशिव जिल्हा उद्योग आणि रोजगाराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगताना सरनाईक यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग घटकांशी झालेल्या सामंजस्य करारांचा उल्लेख केला. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
युवकांच्या हाताला काम आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ उपक्रमात जिल्ह्यातील उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.युवकाला योग्य रोजगार आणि उद्योगाला योग्य मनुष्यबळ हेच आपल्या विकासाचे सूत्र आहे असे त्यांनी सांगितले.
सुरक्षित,आधुनिक परिवहन व्यवस्था हे विकासाचे माध्यम
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि आधुनिक परिवहन व्यवस्था महत्त्वाची असल्याचे सांगत सरनाईक यांनी रस्ते सुरक्षा,वाहन तपासणीतील पारदर्शकता आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला.महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमातून अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटनातून स्थानिक रोजगाराला नवी संधी
तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र, धाराशिव लेणी,नळदुर्ग,परंडा,संत गोरक्षनाथांचा वारसा आणि जागजीचे महालक्ष्मी मंदिर यांसारख्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळवून देण्यावर भर असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.“वारसा जपू,पर्यटन वाढवू आणि स्थानिकांच्या हाताला काम देऊ,ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी,भूजल सुरक्षेसाठी जलसंधारणाची कामे, गोदामांच्या माध्यमातून धान्य साठवणूक क्षमता वाढविणे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
‘मराठवाड्याची खरी ताकद मातीमध्ये नव्हे, तर माणसांच्या जिद्दीमध्ये’
भाषणाच्या समारोपात पालकमंत्री सरनाईक यांनी मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाची आजच्या आव्हानांशी सांगड घातली.त्या काळात आपल्या पूर्वजांकडे साधने कमी होती पण जिद्द मोठी होती.आज आपल्याकडे साधने, तंत्रज्ञान,प्रशासन आणि योजना आहेत. त्याला एकजुटीची ताकद जोडली तर कोणतेही संकट मोठे नाही असे ते म्हणाले.
ज्या भूमीने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि संकटांवर मात करून विकासाची वाट धरली,तीच भूमी आज पाणीटंचाईच्या संकटावरही नक्कीच मात करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,गरिबांच्या ताटात अन्न पोहोचवणे आणि जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपत धाराशिवला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प या दिनी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.यामध्ये सिद्धनाथ अनपट यांना तुळजापूर,आकाश जावळे यांना वाशी,तर साक्षी शिंदे यांना कळंब तहसील येथील आपले सरकार सेवा केद्र मंजूर करण्यात आले.त्यामुळे या अनाथ बालकांना या केंद्रांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
तसेच सामाजिक न्यायाच्या योजनांमधून कष्टकरी घटकांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेंतर्गत सात लाभार्थ्यांना प्रत्येकी एक पत्र्याचा स्टॉल तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या लाभार्थ्यांमध्ये मंगेश नामदेव साबळे (पळसप),वैभव दत्तात्रय बनसोडे (तेर),बालाजी सदाशिव शेरखाने (रुईभर), ज्ञानेश्वर गोपाळ माने (पोहनेर), बब्रुवान व्यंकट हांकारे (सांजा), पांडुरंग जीवन शेरखाने (चिलवडी) आणि दत्तात्रय नानासाहेब राजगुरू (बावी) यांचा समावेश होता.या सातही लाभार्थ्यांना प्रत्येकी एक स्टॉल आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी- कर्मचारी,ज्येष्ठ नागरिक,माजी सैनिक,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव,महिला भगिनी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले.