Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला शासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील अखंड मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच निषेधार्थ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास विरोध करण्याचा इशारा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.


यासंदर्भात अखंड मराठा समाज, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे जात असताना त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शांततामय आंदोलनाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असून, आंदोलनाला परवानगी नाकारणे ही लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
एकीकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करताना स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मूल्यांचा गौरव केला जातो आणि दुसरीकडे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या समाजाच्या नेतृत्वाला आंदोलनाची परवानगी नाकारली जाते, ही विसंगती असल्याचा आरोप अखंड मराठा समाजाने केला आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी होणारे ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते न करता धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा सन्मान व्हावा, तसेच लोकशाही मूल्यांप्रती प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित व्हावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न शासनाने गांभीर्याने विचारात घेऊन शांततामय आणि संविधानिक आंदोलनाचा मार्ग खुला ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन १७ सप्टेंबरच्या ध्वजारोहणाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी अखंड मराठा समाज, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे