निवडणूक काळातील मार्गदर्शक सूचनाजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६

Spread the love

आदर्श आचारसंहिता : काय करावे व काय करू नये

काय करावे
चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरू ठेवता येतील.यासंदर्भात शंका निर्माण होईल अशा बाबींसाठी राज्य निवडणूक आयोग /जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण अथवा मान्यता प्राप्त करून घ्यावी.पूर,अवर्षण,साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साहाय्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना सुरू करता येतील.तसेच या संदर्भात सुरू असलेल्या योजना पुढे सुरू ठेवता येतील.मरणासन्न किंवा गंभीररीत्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे कार्य समुचित मान्यतेने पुढे सुरू ठेवता येईल.मैदानांसारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना / निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.त्याचप्रमाणे सर्व पक्षांना / उमेदवारांना हेलिपॅडचा वापरही नि:पक्षपातीपणे उपलब्ध करून दिला पाहिजे.

विश्रामगृहे,डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने याबाबत निवडणूक आयोग व शासनाने काढलेल्या आदेशांचे संपूर्ण पालन करून,सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करून देणे अनुज्ञेय असल्यास तसे करावे.इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर करण्यात येणारी टीका ही केवळ त्यांच्या धोरणे, कार्यक्रम,पूर्वीची कामगिरी व पार पाडलेली कामे यापुरतीच मर्यादित असावी.

शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.प्रस्तावित सभेची जागा व वेळ याबाबत स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देऊन आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त कराव्यात.प्रस्तावित सभेच्या जागी निबंधात्मक अथवा प्रतिबंधक आदेश जारी असतील तर त्यांचे संपूर्ण पालन करावे. आवश्यक असल्यास सवलतीसाठी अर्ज करून ती सवलत वेळेत प्राप्त करावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक (Loudspeaker) किंवा इतर सवलतींचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी घेणे आवश्यक आहे.

सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीसांचे सहकार्य घ्यावे.कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभ वेळ व जागा,मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग तसेच मिरवणूक समाप्त होण्याची वेळ व जागा आगाऊ निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी.मिरवणूक ज्या वस्तीमधून जाणार आहे,त्या ठिकाणी लागू असलेल्या कोणत्याही प्रतिबंधात्मक आदेशांची खात्री करून त्यांचे पालन करावे.तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे.

मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये.ज्यांचा क्षेपक किंवा हत्यार म्हणून गैरवापर होऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी व्यक्तींनी बाळगू नयेत.मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेत पार पडावे यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.उमेदवार व त्यांचे अधिकृत कार्यकर्ते यांनी विहित परवानगी घेऊन निवडणूक प्रशासनाकडून ओळखपत्रे व बिल्ले प्राप्त करून ती दर्शनी भागावर लावावीत.मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह,उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव नमूद नसावे.मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापराबाबत लागू असलेल्या निर्बंधांचे पूर्णपणे पालन करावे.

राज्य निवडणूक आयोग,जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांचे वैध प्राधिकारपत्र असल्याशिवाय कोणालाही मतदान कक्षात प्रवेश देण्यात येऊ नये.मुख्यमंत्री,मंत्री, खासदार,आमदार यांनाही यामध्ये सूट नाही.निवडणूक प्रक्रियेतील कोणतीही तक्रार किंवा समस्या निवडणूक निर्णय अधिकारी,क्षेत्र/प्रभाग दंडाधिकारी किंवा नियुक्त निरीक्षकांच्या निदर्शनास आणावी.
राज्य निवडणूक आयोग,जिल्हाधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सर्व आदेश,निर्देश व सूचनांचे काटेकोर पालन करावे.

काय करू नये
शासकीय वाहने,कर्मचारी किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.यामध्ये केंद्र व राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम,स्थानिक स्वराज्य संस्था,महानगरपालिका,नगर परिषद, सहकारी संस्था,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक निधी गुंतवलेल्या सर्व संस्थांचा समावेश आहे.सत्ताधारी पक्ष किंवा शासनाने साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी खर्चातून जाहिराती देऊ नयेत. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे,कोनशिला बसवणे,नवीन रस्ते किंवा इतर विकासकामांची आश्वासने देणे टाळावे.शासन किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या तात्पुरत्या (Ad-hoc) नियुक्त्या करू नयेत.मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसह) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी किंवा मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्ष किंवा मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही.

निवडणूक प्रचारासोबत कोणतेही सरकारी कामकाज पार पाडू नये.मतदारांना आर्थिक किंवा अन्य कोणतेही प्रलोभन देऊ नये.मतदारांच्या जातीय किंवा धार्मिक भावनांना आवाहन करू नये.जाती, जमाती,धर्म किंवा भाषिक गटांमध्ये तेढ,वैमनस्य किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये.इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनावर टीका करू नये.

पडताळणी न केलेले आरोप किंवा विकृत स्वरूपात टीका करू नये.निवडणूक प्रचार,भाषणे,फलक,संगीत इत्यादींसाठी कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये.लाच देणे,दबाव टाकणे,धाकदपटशा, खोट्या नावाने मतदान करणे किंवा मतदारांना ने-आण करणे यासारख्या भ्रष्ट प्रथा प्रतिबंधित आहेत.निषेध व्यक्त करण्यासाठी कोणाच्याही घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरू नयेत.

कोणत्याही व्यक्तीच्या मालकीच्या जमिनी,इमारती,भिंती इत्यादींचा परवानगीशिवाय वापर करू नये.इतर पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सभा व मिरवणुकांमध्ये अडथळा निर्माण करू नये.एका पक्षाची सभा सुरू असलेल्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाने मिरवणूक काढू नये.इतर पक्षांनी लावलेली प्रचार सामग्री काढून टाकू नये.आक्षेप असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

मतदानाच्या दिवशी मतदान कक्षाजवळ किंवा ओळखचिठ्ठी वाटपाच्या ठिकाणी कोणतेही प्रचार साहित्य प्रदर्शित करू नये.
ध्वनिक्षेपकांचा वापर सकाळी ६ पूर्वी किंवा रात्री १० नंतर तसेच लेखी परवानगीशिवाय करू नये.The Noise Pollution (Regulation and Control) Rules,2000 चे काटेकोर पालन करावे.सार्वजनिक सभा,मिरवणूक किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकांचा वापर केवळ लेखी परवानगीनेच करावा.रात्री १० नंतर सभा सुरू ठेवण्यास परवानगी नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे.निवडणूक काळात पैशांचे,मद्याचे किंवा वस्तूंचे वाटप करू नये.

  • Related Posts

    धाराशिव – पळसप पंचायत समिती 655 मतांनी शामल विशाल पाटील विजयी

    Spread the love

    Spread the love

    मतमोजणी सुरु – धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू – मतमोजणीची छायाचित्रे

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *