
धाराशिव : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, धाराशिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रेसनोटनुसार, विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते प्रत्येक मतदाराकडून गणनापत्र भरून घेत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप हे गणनापत्र भरलेले नाही, त्यांनी तातडीने संबंधित बी.एल.ओ.शी संपर्क साधावा. गणनापत्र भरताना प्रत्येक मतदाराने एक पासपोर्ट आकाराचा स्वाक्षरीयुक्त फोटो, आधार कार्ड तसेच आई-वडील किंवा आजी-आजोबांची आवश्यक माहिती जवळ ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, मागील SIR मधील माहिती voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ECINet App वर उपलब्ध असून, त्याद्वारे मतदारांना आपली किंवा पालकांची माहिती तपासता येणार आहे.
तालुक्यातील Enumeration Form चे डिजिटायझेशन शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले B.L.A. प्रतिनिधी, तसेच बी.एल.ओ. यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात येत असून, रिक्षा व नगर परिषद धाराशिव यांच्या घंटागाड्यांद्वारेही जनजागृती केली जात आहे.
धाराशिव शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही गणनापत्र भरण्याचा प्रतिसाद कमी असल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणले आहे. विशेषतः शाहू नगर, काकडे प्लॉट, गालीब नगर, पोलीस क्वार्टर परिसर, समता नगर, आनंद नगर, राम नगर, तुकाराम नगर, लक्ष्मण नगर, दत्त नगर, सेवालाल कॉलनी, साईनगर, शालीमार हॉटेल परिसर, तांबरी विभाग, बँक कॉलनी, भीम नगर, खाजा नगर, मारवाडी गल्ली, रायबान गल्ली, काळा मारुती चौक, गणेश नगर, तुळजापूर नाका परिसर, इंदिरा नगर, सावित्रीबाई सोसायटी, शिक्षक कॉलनी, भानू नगर, शांतिनिकेतन, समर्थ नगर, वरुड रोड, खडकपुरा, उबरे गल्ली, चव्हाण गल्ली, मुंडे गल्ली, सांजावेस गल्ली, शेखबाने गल्ली, खिरणीमळा परिसर, भारत विद्यालय परिसर, ओम नगर, भवानी चौक, टापरे बिल्डिंग परिसर, निर्धार कॉलनी, देवकते गल्ली, फकीरा नगर, वरसाद लहुजी साळवे चौक परिसर, बौद्ध नगर या भागांतील नागरिकांनी तातडीने गणनापत्र भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गणनापत्र (EF) भरण्याची अंतिम मुदत ८ ऑगस्ट २०२६ असून, या मुदतीपूर्वी सर्व मतदारांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराचे गणनापत्र भरून आपले नाव मतदार यादीत सुरक्षित ठेवावे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.