भाविकांच्या जीवाशी खेळू नका ! तुळजाभवानी मंदिर संस्थानने तातडीने कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करावी; नगरसेवकांची मागणी

Spread the love

हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास किंवा अपघाताच्या प्रसंगी मिळणार तातडीची वैद्यकीय मदत; आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिकेसाठी मंदिर संस्थानला निवेदन!

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूर नगरीत दाखल होतात. विशेषतः नवरात्र महोत्सव आणि यात्रेच्या काळात भाविकांची संख्या प्रचंड वाढते. मात्र, गर्दीच्या या काळात एखाद्या भाविकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, श्वास घेण्यास त्रास झाला किंवा अपघात घडला, तर तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन तुळजापूर नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने स्वतंत्र कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिर संस्थानच्या अध्यक्षांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात तुळजापूर हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः नवरात्रोत्सव आणि विविध धार्मिक यात्रांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा वेळी अचानक उद्भवणाऱ्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीत रुग्णाला प्राथमिक उपचार आणि योग्य वैद्यकीय सुविधा तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

केवळ रुग्णवाहिका नव्हे, तर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची मागणी!

प्रस्तावित कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन सुविधा, डिफिब्रिलेटर, ईसीजी मॉनिटर तसेच अन्य जीवनरक्षक उपकरणे उपलब्ध असावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका, श्वसनाचा त्रास, अपघात किंवा अन्य गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी मोठी यंत्रणा आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून संस्थानने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. केवळ दर्शनाची व्यवस्था पुरेशी नसून भाविकांच्या जीवितरक्षणासाठीही आवश्यक सुविधा उभारणे गरजेचे आहे, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली आहे.

या निवेदनावर नगरसेवक अमोल माधवराव कुटवळ, आनंद नानासाहेब जगताप, रणजित चंद्रकांत इंगळे, अक्षय धनंजय कदम आणि नगरसेविका प्रगती गोपाळ लोंढे यांच्या सह्या आहेत.

आता मंदिर संस्थान या मागणीची कितपत दखल घेते आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे तुळजापूरकरांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    श्री सिद्धिविनायक कारखान्यातर्फे दिवाळीनिमित्त ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर बांधवांना फराळाचे वाटप

    Spread the love

    Spread the loveकारखान्यात दिवाळीचा आनं दोत्सव; अधिकारी, कर्मचारी व ऊस वाहतूकदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती कळंब तालुक्यातील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक ली खामसवाडी या कारखान्याचे संस्थापक चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली…

    विजापूरच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ४९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – कर्नाटक राज्यातील विजापूर येथील भाविक गौरीश मल्लिकार्जुन मलगे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ४९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण केला. गौरीश मल्लिकार्जुन मलगे हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *