
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री घडलेली आगीची भीषण दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करीत शेजारील घरालाही आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची पाहणी करून बचावकार्य आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावकरी, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्घटनेतील सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारी बाब म्हणजे आपल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पित्यालाही आपले प्राण गमवावे लागले. मुलींना वाचवण्यासाठी एका बापाने केलेला शेवटचा संघर्ष आठवला तरी मन सुन्न होते. काळाने एका क्षणात हसते-खेळते कुटुंब हिरावून घेतले. एका तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले असले तरी सहा निष्पाप जीवांना वाचवता आले नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली.

या भीषण दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा असा अंत होणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आमदार कैलास पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या आप्तस्वकीयांना मिळो आणि मृतात्म्यांना शांती लाभो, अशी प्रार्थना केली.