
आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा नेते मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी फराळ किट वाटपाचा शुभारंभ; नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
धाराशिव – दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलावा, या उदात्त हेतूने धाराशिव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांसाठी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांच्या वतीने यंदाही दिवाळी फराळ किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत तब्बल 1500 फराळ किटचे वाटप करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ धाराशिवच्या नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सण-उत्सव साजरे करणेही सर्वसामान्य कुटुंबांसाठी कठीण झाले आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेवक विलास लोंढे यांनी प्रभागातील गोरगरीब, कष्टकरी आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विलास लोंढे यांनी मागील अनेक वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा यंदाही अखंडित ठेवत 1500 कुटुंबांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. केवळ राजकीय पदापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांनी प्रभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे, विलास लोंढे हे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात असतात. गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत, शस्त्रक्रियांचा खर्च, गरजू कुटुंबांतील मुला-मुलींच्या विवाहासाठी सहकार्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशा विविध माध्यमांतून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत. पद आणि प्रतिष्ठेपेक्षा सामान्य माणसाच्या अडचणींना प्राधान्य देत मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.
दिवाळी फराळ किट मिळाल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘विलास लोंढे यांच्यामुळे आमच्या घरातील दिवाळी गोड झाली,’ अशा भावनिक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त करत त्यांचे आभार मानले. गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम केवळ फराळ वाटपापुरता मर्यादित नसून सामाजिक जाणीव आणि माणुसकी जपणारा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका अलकाताई पारवे, नगरसेविका राजकन्याताई आडसुळ, नगरसेविका राणीताई पवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रीतीताई कदम, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्राजक्ता गोरे, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका विद्याताई अमर कांबळे (माने), प्रभागातील प्रमुख सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय पदाला सामाजिक कार्याची जोड देत वर्षभर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणारे विलास बापू लोंढे यांनी दुष्काळाच्या संकटातही 1500 कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न प्रभाग क्रमांक 20 मध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.