अवैध मद्यनिर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धडाका ; विशेष मोहिमेत ६४ गुन्हे दाखल, ५३ आरोपींना अटक

Spread the love

११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
जागजी तांड्यावर संयुक्त पथकाचा छापा,चार आरोपींना अटक
दुष्काळ आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई तीव्र नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

धाराशिव – जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती,विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून अवैध मद्यव्यावसायिकांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.या मोहिमेंतर्गत २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरात ६४ गुन्हे दाखल करून ५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत देशी-विदेशी मद्य,बिअर,अवैध हातभट्टीची दारू,रसायन आणि ताडीसह तब्बल ११ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील जागजी तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून आठ गुन्हे दाखल केले असून चार आरोपींना अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या ऑक्टोबर २०२६ मधील पत्रानुसार २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती,विक्री व वाहतुकीविरोधात संयुक्त मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय उपायुक्त अभिनव बालुरे यांच्या निर्देशानुसार तसेच धाराशिवचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हर्षवर्धन शिंदे आणि उपअधीक्षक प्रसाद सतीश खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

जागजी तांड्यावर संयुक्त पथकाचा छापा; २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
या मोहिमेअंतर्गत ४ नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिव विभागाचे निरीक्षक, भरारी पथकाचे निरीक्षक आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धाराशिव तालुक्यातील जागजी तांडा येथे धडक कारवाई केली.या कारवाईत आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली. पथकाने १७० बल्क लिटर अवैध हातभट्टीची दारू आणि ६ हजार २०० बल्क लिटर रसायन असा एकूण २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ६४ गुन्हे दाखल करून ५३ आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत १९६.९२ बल्क लिटर देशी दारू,१२८ बल्क लिटर विदेशी दारू,७.८ बल्क लिटर बिअर,१ हजार ५१ बल्क लिटर अवैध हातभट्टीची दारू,१६ हजार ८०० बल्क लिटर रसायन आणि १ हजार ५९५ बल्क लिटर ताडी जप्त करण्यात आली.जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ११ लाख २२ हजार ३०० रुपये आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहिता काळात २२२ गुन्हे ; २११ आरोपींना अटक
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने २२ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०२६ या आदर्श आचारसंहिता कालावधीतही राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यव्यवसायाविरोधात व्यापक कारवाई केली होती.या कालावधीत एकूण २२२ गुन्ह्यांची नोंद करून २११ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तीन वाहने जप्त करण्यात आली.

या कारवाईत १ हजार ९९५.८९ बल्क लिटर देशी दारू,२५०.४ बल्क लिटर विदेशी दारू,७९.९८ बल्क लिटर परराज्यातील मद्य, १४५.२ बल्क लिटर बिअर,३ हजार ५५२ बल्क लिटर अवैध हातभट्टीची दारू,२५ हजार ६५० बल्क लिटर रसायन आणि ३ हजार २०५ बल्क लिटर ताडी जप्त करण्यात आली.या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ३० लाख ७७ हजार १३० रुपये आहे.

चिंचपूर येथे गोवानिर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त
दरम्यान २३ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम विभागाच्या निरीक्षकांनी परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे कारवाई केली होती.या कारवाईत एक गुन्हा दाखल करण्यात आला असून ६०.४८ बल्क लिटर गोवानिर्मित विदेशी दारू जप्त करण्यात आली. जप्त मद्याची एकूण अंदाजित किंमत ७ लाख ९२ हजार रुपये आहे.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर पाण्याऐवजी इतर रसायनांचा वापर करून अवैध मद्यनिर्मिती होण्याची दाट शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध व बनावट मद्याची विक्री होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.अशा प्रकारे रसायनमिश्रित अवैध दारू किंवा ताडीचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत अपायकारक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अवैध मद्य किंवा ताडीचे सेवन करू नये,असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

अशा प्रकारे रसायनमिश्रित अवैध दारू किंवा ताडीचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत अपायकारक ठरू शकते.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अवैध मद्य किंवा ताडीचे सेवन करू नये,असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती,विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे.अवैध मद्यविक्री करणारी हॉटेल्स,ढाबे तसेच इतर ठिकाणांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला द्यावी. त्याचप्रमाणे अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा.अवैध मद्यव्यवसायाला आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतील,असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    जिल्हा परिषद धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

    Spread the love

    Spread the loveराष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानातील उल्लेखनीय कामगिरीची राज्य शासनाकडून दखल; पशुसंवर्धन विभागाला उत्कृष्टता प्रमाणपत्र प्रदान दुष्काळी परिस्थितीत पशुधन संवर्धन, कृत्रिम रेतन आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीचा गौरव! धाराशिव…

    श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक भेंडोळी उत्सव उत्साहात संपन्न

    Spread the love

    Spread the love तुळजापूर – श्री क्षेत्र तुळजापूर येथे दीपावलीतील काळभैरवनाथांचा पारंपरिक भेंडोळी उत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. काशी आणि तुळजापूर येथे साजरा होणाऱ्या या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *