एसटीच्या ४३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना १० हजारांची दिवाळी भेट; पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल

Spread the love

महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचीही घोषणा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ४३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. यासोबतच पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचल देण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेतला जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली.

एसटी महामंडळाच्या सुमारे ४३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दिवाळीच्या सणानिमित्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ५८ टक्के असलेला महागाई भत्ता आता ६० टक्के करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

एसटी महामंडळातील कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त आर्थिक मदत देणे ही केवळ औपचारिकता नसून आपले कर्तव्य आहे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले. एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असून, कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यासाठी शासन व महामंडळ सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे हित जपतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन व महामंडळ कटिबद्ध असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    जिल्हा परिषद धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

    Spread the love

    Spread the loveराष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानातील उल्लेखनीय कामगिरीची राज्य शासनाकडून दखल; पशुसंवर्धन विभागाला उत्कृष्टता प्रमाणपत्र प्रदान दुष्काळी परिस्थितीत पशुधन संवर्धन, कृत्रिम रेतन आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीचा गौरव! धाराशिव…

    श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक भेंडोळी उत्सव उत्साहात संपन्न

    Spread the love

    Spread the love तुळजापूर – श्री क्षेत्र तुळजापूर येथे दीपावलीतील काळभैरवनाथांचा पारंपरिक भेंडोळी उत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. काशी आणि तुळजापूर येथे साजरा होणाऱ्या या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *